रविवार विशेष : जड जात आहे मुलांचे मोबाइल वेड

लेखन - पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक, दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद - 98921622348

कोरोना काळात गेली दीड वर्ष मुलांनी शाळेचे तोंडही बघितले नाही. घरात कोंडून ठेवलेली मुले दिवसभर करतील तरी काय? सकाळ-संध्याकाळ काही तास खेळून झाल्यावर मुलांचा मोर्चा मोबाइलकडे वळतो. आधीच ऑनलाइन वर्गाच्या नावावर त्यांची मोबाइलशी मैत्री घट्ट झाल्यावर त्यांचे मोबाइल वेड वाढले आहे. मुलांच्या हातातून मोबाइल कसा काढावा हा प्रश्न पालकांना सतावत आहे.

एरवी लॉकडाऊन नसताना सुद्धा मुलांच्या या मोबाइल वेडावर पालक प्रश्न निर्माण करीतच होते. आता त्याला कोरोना काळ आणि लॉकडाऊनचा आधार मिळाला आहे. नेटधारी मोबाइल मुलांच्या हातात आल्यावर त्यांचा मैदानावरचा वेळ आपोआप कमी झाला आहे. नेटवर असणारे एकापेक्षा एक उत्कंठावर्धक खेळ आणि त्यातून निर्माण होणारी मुलांची रुची बघितली की हा भविष्यात किती मोठा प्रश्न तयार होणार आहे याची कल्पना येते. पालक प्रारंभिक अवस्थेत रडणार्‍या मुलाला गप बसविण्यासाठी त्याच्या हातात मोबाइल देतात, नंतर मोबाइलशिवाय मुले गप्पच बसत नाहीत. त्यामुळे आईची घरकामे सहज-सुलभ होत असली तरी या धोकादायक व्यसनाकडे आपण पाल्यांना नकळत ढकलत आहोत याची कल्पना पालकांना नसते.
तीन वर्षाच्या आत ज्यांची मुले आहेत असे पालक मोठ्या कौतुकाने सांगतात की ‘आमचा निखिल ना, मोबाइलशिवाय राहातच नाही. अगदी जेवताना सुद्धा त्याच्या हातात मोबाइल द्यावाच लागतो. नाही तर सारं घर अंगावर घेतो. कुणी पालक कौतुकाने सांगतात की आमच्या मुलीला ना, सगळं कळते मोबाइलमधले. सुरुवातीला कौतुक म्हणून किंवा कुतूहल म्हणून मुलांच्या हातात दिला जाणारा मोबाइल पुढे त्याचा विरंगुळा बनतो आणि पालकांची डोकेदुखी हे लक्षात घ्यायला हवे. मोबाइल सतत हाताळणे, बघणे, गेम खेळणे यातून मुलांच्या डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहे. यातून मुलांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणा वाढीस लागले आहे. मैदानावरच्या खेळांची रुची यातून कमी हात असल्याचे आता पालकांना जाणवत आहे.

आई-वडील नोकरदार किंवा अन्य व्यावसायिक असतील आणि घरात खेळायला कुणी साबती नसेल त्या घरातल्या मुलांच्या हातात हमखास मोबाइल सोपवला जातो. घरात एकटे राहणार्‍या मुलांजवळ मोबाइल हवाच, पण त्याचे नियमन सध्या कुणाला करता येत नाही. मोबाइल अवघड जागेचे दुखणे बनले आहे. मुलांच्या हातात मोबाइल असला तरी त्याला संपर्क करणे सोपे जाते मात्र त्याचा स्क्रीन टाइम वाढण्याचा धोका कायम आहेच.

मुलांना घरातच मोबाइल किंवा टीव्हीशिवाय कोंडून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. त्यांच्याशी खेळावे अशी कुणाची तयारी आणि तेवढा वेळ पालकांच्या हातात उरलेला नाही. 80 टक्के लहान कुटुंबातले आजी-आजोबा कधीच गायब झाले आहेत. ज्यांना आजी-आजोबा आहेत ते खेड्यावर असतात, मुलांचा नि त्यांचा दुरावा वाढला आहे. अशा चक्रात सध्या छोट्या कुटुंब व्यवस्था अडकून पडल्या आहेत. त्यातून मार्ग काढणे सध्यातरी कठीण आहे.

ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी तरी वेळेचे नियोजन करण्याची गरज आहे. तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची तजवीज केली असेल तर थोडी वेळेची सुद्धा तजवीज करण्याची गरज आहे. सकाळी आणि संध्याकाळी एक-दोन तास मुलांसाठी द्यायला हवे, त्यांच्यात मिसळून, त्यांच्या पातळीवर जाऊन खेळायला, मिसळायला हवे. हे नियोजन अशक्य नसले तरी कठीण आहे, नोकरी किंवा व्यवसायावर जाणारा पालक घरी आल्यावर त्याच उत्साहात असेल याची शाश्वती नसते. त्यामुळे मुलांसाठी वेळ देण्याचे नियोजन एकदा तुम्ही करू शकाल मात्र ते दीर्घकाळ पाळणे आणि त्यात सातत्य ठेवणे कठीण आहे. मात्र मुलांच्या निकोप वाढीसाठी ते करावे लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जगाच्या स्पर्धेत आपला पाल्य सहज टिकावा असे ज्यांना वाटते त्यांनी तरी हे नियोजन करण्यावर भर द्यायला हवा.

पौगंडावस्थेत असणार्‍या मुलाचा मोबाइल वापर तर आणखी डोकेदुखी बनली आहे. शाळा, मित्र, कोचिंग क्लासेस आणि इतर संपर्कांची व्हॉट्सअप ग्रुपची मोठी संख्या प्रत्येकाच्या मोबाइलवर वाढत आहे. संपर्काची प्रमुख साधने आता सोशल मीडिया बनलेले असताना टीनेजर मुलांचे मोबाइलवर तासन्तास गप्पा मारणे वाढले आहे. नेटवरील मोठ्या जगात ही मुले हरवून तर जाणार नाहीत ना, अशी अनामिक भीती पालकांना वाटत आहे. घरातल्या स्त्रियांच्या मेंदूवर त्याचे दडपण वाढले आहे. यातून सुटका कशी करावी यासाठी मुलांसाठी समुपदेशन सुद्धा वाढले आहे. मोबाइलचा सतत आकर्षित करणारा पडदा पालकांचा शत्रू होण्याआधी आपण या मुलांना मैदानावर न्यायला हवे.