महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग १

प्रेरणादायी लेखमालेबाबत थोडेसे..!
आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांपासून आतापर्यंत प्रेरणादायी घटनांचा मौलिक इतिहास लाभला आहे. स्वराज्यापासून ते सध्याच्या काळात ह्यामुळेच प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आपण पाहू शकतो. अशा प्रेरक व्यक्तिमत्वांपासून आपल्याला शक्तिवर्धक ऊर्जा मिळते. ह्या विषयांवर आधारित लेखमाला आजपासून आपल्याला वाचायला मिळेल.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते

लेखन : अशोक लक्ष्मण कुमावत
संवाद : 9881856327

तो स्वराज्याचा आणि मराठी मातीचाच अखेरपर्यंत बनून राहिला होता. इसवी सन 1640 मध्ये सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील वसंत गडाच्या पायथ्याला असलेल्या तळबीड गावात पहाडी छातीच्या पाटीलकीच्या घराण्यात  स्वराज्याचा शिलेदार तो नरवीर जन्माला आला होता. लहानपणापासून अंगात घरंदाजी शौर्याचं रक्त सळसळत होते. त्याच्या पराक्रमाच्या कथा सर्वदूर पसरल्या होत्या. तोच पराक्रम तीच मर्दुमकी त्याला एका सच्चा मावळ्यापासून तर स्वराज्याच्या महत्वाचा पाईक बनवून गेली होती.

त्या निधड्या छातीच्या विराच्या अंगात हत्तीच बळ सामावलेले होते. 1674 ला छत्रपती शिवरायांनी त्याच्या खांद्यावर स्वराज्य रक्षणासाठी महत्वाची जबाबदारी दिली होती. त्याचे नाव काढताच शत्रूच्या पायाखालची वाळू आपोआपच सरकायची.
1675 ला बुऱ्हाणपूर लुटून त्याने मोगलाईला चांगलाच झटका दिला होता. प्रचंड संपत्ती रायगडाच्या खजिन्यात अर्पण केली होती. शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने स्वराज्याची अति बिकट परिस्थिती त्याने मोठ्या कौशल्याने हाताळली. स्वराज्य जेव्हा कट कारस्थानांच्या महालाटेत सापडलं आणि चक्रव्यूहात आता ते संपणार अशावेळी त्याने निर्णायक भूमिका बजावली व स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे उभा राहिला होता.
महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील एक विक्षिप्त अण्णाजी दत्तो सारख्या नतद्रष्टानी संभाजी महाराजांना विरोध केला होता. कूटनीती आखली, राजाराम महाराजांना गादीवर बसवून कारभार हातात घ्यायचा असा कट रचन्यात आला आणि साम दाम दंड भेद यांचा शिताफीने वापर करून मंत्रीमंडळातील ‘काही’ प्रामाणिक व इमानदार माणसांची मने वळवून त्यांना सुद्धा त्यात सहभागी करून घेतले होते.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरला होता. एव्हढ्यावरच त्यांचे भागले नाही तर स्वतः महाराणी सोयराबाईसुद्धा सत्ता आणि पुत्रप्रेम यांच्या लाभला बळी पडून या कारस्थानात सामील झाल्या होत्या. आता फक्त वाटेतल्या सिंह दूर कसा सारायचा हाच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. तो म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे. त्यांचं काय ? त्यासाठीच त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताची नाती, माया, लोभ यांचे जाळे टाकून त्या पराक्रमी योध्याचे मन वळविण्याचा घाट घातला गेला.

तसं फर्मान घेऊन मंत्री त्याच्याकडे पोहोचले. परंतु तो खरा स्वराज्यभक्त होता. इतर सरदारांप्रमाणे स्वराज्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन स्वतःला वाहून घेतलेले. त्यांनी विरोधी कट ओळखला आणि रक्ताच्या बहीणीच्या आणि भाच्याच्या पारड्यात आपलं वजन न टाकता सत्याच वाण उचलत शंभुराजांच्या मागे खंबीरपणे उभं रहायचा निर्णय घेतला. त्यांच्या ठाम निर्णयाने शंभुराजांनी स्वराज्याचा कारभार हतात घेतला आणि त्यांच्याच साक्षीने राजांनी राज्याभिषेक करून घेतला. तो असा भाग्यवान सरदार होता की ज्याने स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी बघितला व त्याचा अंश झाला.

विचार करा फक्त जर तो नसता किंवा तो बहिणीच्या मायेला, भाच्याच्या प्रेमाला, नीतिमत्ता ढासळलेल्या मंत्र्यांच्या कारस्थानाला बळी पडला असता तर हिंदुस्थानचा इतिहास काही वेगळाच असता. संघर्ष आणि प्रमाणिकपणाचा नवा इतिहास त्याने स्वराज्यासाठी निर्माण केला होता. आजही ती विचारधारा आपल्या सगळ्यांना नवी ऊर्जा देते.
तो शूरवीर योध्दा म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती श्री. हंसजी उर्फ हंबीरराव बाजी – मोहिते होय. ( क्रमश: )

( लेखक अशोक लक्ष्मण कुमावत हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक असून लेखक, कवी, सूत्रसंचालक, वक्ता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. )


    

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!