ढाण्या वाघ घडवणारे भिकाजी पांगाजी जाधव यांचे चंद्रमौळी जीवन

लेखन : नीरज चव्हाण
महाराष्ट्र प्रदेश महानिरीक्षक
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

कमी शिक्षण झालं असलं तरी उच्चतम ध्येयाने प्रेरित होऊन आपले अख्खे जीवन अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी खर्च करणारे व्यक्ती जणू देवता आहेत. समाजाची दशा आणि दिशा पाहून पुढील १०० वर्षाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृतीबद्ध कार्यक्रम प्रत्यक्षात आणतांना अशा व्यक्ती समाजाला मोठी दिशा देतात. आदिवासी समाजासाठी जीवाची ओवाळणी करणारे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांवर प्रखर निष्ठा असणारे असेच देवतुल्य व्यक्तिमत्व निसर्गवासी भिकाजी पांगाजी जाधव यांचे २२ मे २०२१ ला निधन झाले. सामान्य आदिवासी कुटुंबात जन्माला येऊन गरिबीचे असह्य चटके सोसणाऱ्या भिकाजी जाधव यांनी आदिवासी समाजाचे जीवनमान बदलून टाकण्याचा निश्चय अनेक वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार प्रचंड मेहनत घेऊन आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचाराला थांबवून कल्याण करणारा “विचार” जन्माला घातला. यासाठी प्रसंगी उपासमार सोसून शिक्षणासारखे वाघिणीचे दूध सातत्याने पाजून क्रांतीचा “ज्वालामुखी” प्रज्वलित केला. महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा ढाण्या वाघ संबोधले जाणारे सर्वमान्य नेतृत्व लकीभाऊ जाधव यांना घडवण्यासाठी निसर्गवासी भिकाजी जाधव यांचे कार्य सह्याद्रीपेक्षा मोठे आहे.
निसर्गवासी भिकाजी पांगाजी जाधव यांचा जन्म अकोले तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या पांगवाडी गावात १ जानेवारी १९४० साली झाला. अतिशय सर्वसामान्य आणि कष्ट करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील पोटासाठी होणारी ससेहोलपट त्यांनी जवळून अनुभवली. प्रस्थापितांकडून आदिवासींवर होणारा अन्याय अत्याचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे ज्वलंत विचार रक्तात भिनलेले भिकाजी जाधव यांचे जीवन म्हणजे अनुभवांचा मोठा समुद्र आहे. आपल्या परिसरातील आदिवासींवरचा अन्याय आपण थांबवू शकतो मात्र आपलेच राज्यभर असणाऱ्या बांधवांचा अत्याचार थांबवून त्यांना विकासाच्या प्रवाहात त्यांना कसे आणता येईल ? याचा विचार त्यांना अस्वस्थ करून ठेवायचा. सुविद्य पत्नी सिंधुबाई, भाऊ गोविंद, रंगनाथ, मधुकर यांच्याशी याबाबत त्यांचे जाज्वल्य विचार नेहमी चर्चेत यायचे. एक दिवस तुमच्या विचारांवर प्रचंड  श्रद्धा ठेवून आदिवासी समाजाचा तारणहार निर्माण होईल असे आशादायक विषय होऊन चर्चा थांबायची. मुली रोहिणी, शोभा, फसाबाई, विमल, मंदा यांचे शिक्षण सुरू असताना लकीभाऊ भिकाजी जाधव यांच्याकडे विशेषत्वाने लक्ष घालून त्यांनी आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने काम केले. यासाठी अनेक दिवस उपासमार सोसून त्यांच्या शिक्षणासाठी रक्ताचे पाणी केले.
रक्तात भिनलेला आदिवासी बांधवांचा तारणहार घडवण्यासाठी त्यांनी मूल्यवान विचारांचा जागर लकीभाऊच्या माध्यमातून जागृत केला. खूप मोठे उच्चशिक्षण देऊन आदिवासींच्या नेतृत्वासाठी त्यांनी ढाण्या वाघ घडवला. मागे वळून पाहताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष म्हणून लकीभाऊने आपल्या वडिलांच्या मार्गाने लाखो आदिवासी बांधवांना भयमुक्त करून अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. लकी, आदिवासी जनतेसाठी खूप मोठे कार्य तुला करायचे आहे. ह्याचा विसर अजिबात पडू देऊ नको. मी तुझ्या सोबत नेहमीच असेल याची शाश्वती ठेव. असे शब्द उच्चारून निसर्गवासी भिकाजी जाधव यांनी २२ मे २०२१ ला आपला प्राण अनंतात विलीन केला. तुमच्या सर्व इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडणार नाही असा शब्द लकीभाऊंनी त्यांना दिला.
दि. १ जून २०२१ रोजी निसर्गवासी भिकाजी पांगाजी जाधव यांचा दशक्रिया विधी पांगवाडी पो. तिरडे ता. अकोले येथील सोमेश्वर तीर्थ येथे होत आहे. यानिमित्ताने ऑक्सिजन देणाऱ्या विविध झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचवायला हातभार लागू शकेल. निसर्गवासी भिकाजी पांगाजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!