पूर्वतयारी आमदारकीची – कोण आहेत इच्छुक उमेदवार ? कोणाला मिळेल उमेदवारी ? कसे असेल निवडणुकीचे चित्र ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – काही अपवाद वगळता सातत्याने इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांतील प्रबळ इच्छुक उमेदवारही तिकिटासाठी प्रयत्न करायला लागले आहेत. ही जागा इंदिरा काँग्रेसची असल्याने विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. असे असले तरी विधानपरिषद निवडणुकीतील मतफुटी प्रकरणामुळे त्यांना तिकिटासाठी चांगलाच आटापिटा करावा लागेल असे संकेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे आदिवासी युवा नेते लकीभाऊ जाधव सध्या इंदिरा काँग्रेसमध्ये आहेत. ह्या मतदारसंघातून इंदिरा काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी ते सर्वात पुढे आहेत. प्रदेश स्तरावरील महत्वाच्या नेत्यांनी त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी रसद पुरवली असल्याची चर्चा आहे. संपूर्ण मतदारसंघात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावागावात जनसंपर्क दौरा करून त्यांनी जणू प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सलग दोनवेळा निवडून आलेल्या पण मागील वेळी हुलकावणी मिळालेल्या माजी आमदार शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित तिसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तिकीट मिळवायला इच्छुक आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी ठाकरे गट शिवसेनेची उमेदवारी करावी अशी गळ कार्यकर्त्यांकडून घातली जात आहे. महायुतीमधील शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आणि त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख माजी उपसभापती रवी भोये हे प्रबळ दावेदार आहेत. वाडीवऱ्हेचे माजी सरपंच गोपाळ लहांगे हे सुद्धा स्थानिक भूमिपुत्र ह्या महत्वाच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणुक लढवणार असल्याने माजी नगरसेवक योगेश शेवरे पुन्हा उमेदवारी करतात की पक्षातर्फे नवा चेहरा दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी करण्यासाठी ऐनवेळी निर्णय घेतला जाऊ शकतो. स्वराज्य पक्ष आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे.

माजी आमदार शिवराम झोले स्वतः किंवा कुटुंबातील कोणाला रिंगणात उतरवतात याकडे अनेकांचे लक्ष असेल. अन्य संभाव्य उमेदवारांमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विनायक माळेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, खैरगावचे सरपंच ॲड. मारुती आघाण यांचा समावेश आहे. प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्यास विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे आयात उमेदवार असाही नवा सुर पुढे येईल असे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संभाव्य उमेदवारांनी विधानसभेची रंगीत तालीम करून घेतलेली आहे. याचा फायदा घेण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न आहे. तिकीट नाकारल्यास पुढे काय करायचे याबाबत प्रत्येकाने बी प्लॅनिंग तयार करून ठेवलेली आहे. बंडखोरी रोखण्याचे आव्हान प्रत्येक पक्षाला असणार आहे. दरवेळी जातीय राजकारण विकोपाला जाऊन प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार लढा देतात. या उमेदवारांमुळे विजयासाठी मतांचे विभाजन घातक ठरते. मात्र मतांचे विभाजन हा प्रमुख मुद्दा विजयाची गुरुकिल्ली ठरतो. म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी काही उमेदवारांना निवडणूकीत उतरवले जाणार आहे. २०१९ मधील निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे हिरामण खोसकर ८६ हजार ५६१ मते मिळून ते विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या निर्मला गावित यांना ५५ हजार ६ मते, वंचित बहुजन आघाडीचे लकी जाधव यांना ९ हजार ९७५, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश शेवरे यांना ६ हजार ५६६ मते, भारतीय ट्रायबल पार्टीचे शिवराम खाणे यांना १ हजार ४६१, अपक्ष दत्तात्रय नारळे ७६७, यशवंत पारधी १ हजार २७८, विकास शेंगाळ १ हजार ११०, शैला झोले १ हजार ५०६, नोटाला ३०५९ मते पडली होती. निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सर्वांनी चांगलीच पूर्वतयारी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!