इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोज्गार हमी योजना विशेष मोहीम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या धोरणानुसार आज इगतपुरी तालुक्यात कामांचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत सांजेगाव येथे ह्या योजनेनुसार काम सुरु करण्यात आले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या हस्ते आज रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा संरक्षण बांधण्याचे कामही यावेळी सुरु करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातून सुरवात करण्यात आली.
सहाय्यक गट विकास अधिकारी अमित भुसावरे, विस्ताराधिकारी संजय पवार, विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, कृषी अधिकारी संदीप मोगल, नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सीमा सोनवणे, सरपंच नीता गोवर्धने, उपसरपंच विठ्ठल खातळे, ग्रामसेवक ज्ञानोबा रनेर, ग्रामपंचायत सदस्य उमेश खातळे, मच्छिंद्र गोवर्धने, सिंधूबाई काळे, मंगेश शिंदे, तानाजी सोनवणे, मुक्ता गोवर्धने, इंदुबाई गोवर्धने, मनीषा गोवर्धने, कौशाबाई गोवर्धने आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या आर्थिक वर्षाचा नियोजन आराखडा व लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीत असून, या मोहिमेद्वारे पुढील वर्षाचे नियोजन करण्यासाठी देखील मोठा हातभार लागेल व जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याप्रसंगी दिली.
ह्या योजनेमध्ये प्रामुख्याने मातोश्री शेत पाणंद रस्ते, सिंचन विहीर, जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत, जुनी भात शेती दुरुस्ती, फळबाग लागवड, बैल गोठा, शोषखड्डे आदी कामे जिल्हाभरात राबवली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या जमाती, महिला कुटुंब प्रमुख्य, भूमिहीन मजुर, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील गरीब व अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना याद्वारे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे असे इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांनी सांगितले.