इगतपुरीनामा न्यूज – आगामी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या उमेदवारीत मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नाकारले. मात्र माझी लढाई स्थानिक भूमिपुत्र म्हणून असून मला पक्षाच्या कुबड्यांची अजिबात गरज नाही. येणाऱ्या निवडणुकीत अपक्ष म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनी सांगितले. ऐनवेळी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या लोकांआधी मी प्रबळ इच्छुक उमेदवार होतो. उमेदवारीत मला पक्षाने डावलले याची अजिबात खंत नाही. जनता जनार्दनाचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत इगतपुरीमधून स्वबळावर लढून मोठी ताकद दाखवून देणार असल्याचे बाळासाहेब झोले म्हणाले. माजी आमदार शिवराम झोले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असून एक निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. तब्बल दशकभर इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रभावी नेतृत्व करून जनसामान्य माणसांचा आणि आदिवासी बहुजनांचा बुलंद आवाज उभा केलेला आहे. त्यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असल्याने सिन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली होती. तेथे अजित दादांनी त्यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी कामाला लागा असा शब्द दिला होता. काही दिवसांपूर्वी खंबाळे व घोटी येथे पार पडलेल्या बैठकीत बाळासाहेब झोले यांना उमेदवारी द्यावी असे पदाधिकाऱ्यांनी ठरवले होते. मात्र काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ऐनवेळी आलेले आमदार खोसकर यांच्यामुळे डावलले गेल्याचे ते म्हणाले. माजी आमदार शिवराम झोले १९९५ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. आमदारकीच्या दोन्ही कार्यकाळात मतदारसंघातील विविध महत्वाचे प्रश्न सोडवून विकासाचे फळ लोकांना चाखायला दिले. इगतपुरी मतदारसंघात त्यांनी केलेले शाश्वत विकासाचे कार्य आजही सर्वांना दिसून येईल. वडिलांचा आणि जनतेच्या आशीर्वादाने मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group