मागण्या पूर्ण न झाल्यास २० सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
रस्त्यावर पडलेले मोठ-मोठ खड्डे…पॅचिंग केलेल्या रस्त्याची कच उखडलेली…ठिकाण ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून तयार झालेले तळे… त्यातून जाणारी वाहने अशी परिस्थिती मुंबई आग्रा महामार्गाची झाली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने वाहतूक जास्त असून या महामार्गावर सर्वाधिक अवजड वाहतूक सुद्धा असते. अशा परिस्थितीत वाहनधारक मेटाकुटीला आल्याने चांगकीच कसरत करावी लागत आहे. तातडीने महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी. इगतपुरी तालुक्यातील वाहनांना टोलमाफी द्यावी. इगतपुरी, घोटी, खंबाळे, माणिकखांब, मुंढेगाव, जिंदाल फाटा, पाडळी फाटा, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे येथे हायमास्ट लावावेत अशी मागणी आदिवासी समाज उपजिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी केली आहे. मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेडच्या घोटी टोलनाका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. १९ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास २० सप्टेंबरला घोटी टोलनाक्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम वारघडे यांनी निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई आग्रा महामार्गावर दोन्ही बाजूंनी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी खोल खड्डे आणि धोकादायक उंचवटे तयार झाले आहेत. वाहनधारक यामुळे अतिशय त्रासले आहेत. यामुळे रोज छोटेमोठे अपघात होऊन वाहनांचे नुकसान आणि जीवितहानी वाढली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते. रात्री वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यातून वाहन गेल्यानंतर नादुरुस्त होत आहेत. परिणामी अशी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याचे धोका निर्माण झाला आहे. डागडुजीकडे सुद्धा सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
तातडीने महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी. इगतपुरी तालुक्यातील वाहनांना टोलमाफी द्यावी. इगतपुरी, घोटी, खंबाळे, माणिकखांब, मुंढेगाव, जिंदाल फाटा, पाडळी फाटा, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे येथे हायमास्ट लावावेत अशी मागणी आदिवासी समाज उपजिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी इगतपुरी तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.