कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जागृतीला यश : हरिदास लोहकरे

लेखन : हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य खेड

जगभर थैमान घालून मानवी जीवनात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संपूर्ण मानवी जीवन संकटात आणले आहे. जागतिक अर्थकारण, राजकारण, समाजकारण व आरोग्य यंत्रणा या संकटापुढे हतबल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे बेरोजगारी, आर्थिक मंदी याचे मोठे संकट उभे राहिले आहे. ह्यावर सर्वच पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहे हा आशादायक विषय आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जबाबदार नागरिक म्हणून आपणही एक योगदान देऊ शकतो. ते म्हणजे शक्य तितक्या लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे. तरच आपण कोरोनाला चितपट करू शकतो हे ध्यानात घ्यावे. 

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना, उपलब्ध सामुग्री ज्यात ऑक्सिजन, औषधे, बेड, व्हेंटिलेटर आदी बाबींचा तुटवडा सर्वच ठिकाणी जाणवत आहे. त्यात पुन्हा म्युकरमायकोसिस हा आजारही आला आहे. परिणामी होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव मोठा पर्याय आहे.

आज जागतिक पातळीवर लसीकरणाची मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचे वेगवेगळ्या देशांत सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरण करणे काळाची गरज आहे. या महामारीचा आपण सर्व एकत्रपणे सामना करत आहोत. संसर्गजन्य आजार असल्याने प्रत्येकाने आपापल्या पातळीवर वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी नियम पाळणे क्रमप्राप्त आहे. ज्यात वेळोवेळी हात साबण/ सॅनिटायझरने धुणे, तोंडावर मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे या बाबी आल्या. पण आता हा आजार हवेतून प्रसारित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेणे हे खूपच महत्वाचे आहे हे ध्यानात घ्या.

लसीबाबत असणारे गैरसमज व अफवा यामुळे सुरुवातीला अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करत होते. त्यात आदिवासी समाज तर मोठ्या प्रमाणात लसीकरणापासून दूर होता.
उपलब्ध होणाऱ्या लसी व त्यासाठी होणारी शिबिरे यांची आकडेवारी घेतली तर त्यात हे लक्षात येते. वेळोवेळी केलेली जनजागृती आता उपयुक्त ठरत असून आदिवासी बांधव लसीकरण करीत आहेत.

जनजागरण करण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य अधिकारी, खासगी डॉक्टर, शासकीय कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे काम हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे आता हळूहळू परिस्थिती बदलली आहे. लसीकरणाकडे पाठ फिरवणारा आदिवासी समाज आता लस घेत आहे. आदिवासी भागातील इतर समाज बांधव सुध्दा या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले आहेत.
आम्ही लस घेतली आहे. लस सुरक्षित असून त्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही असे सांगितले जात आहे. त्यातूनही जनजागृतीस हातभार लागला जात आहे.

आदिवासी भागातील लसीकरण वाढवण्यासाठी सामाजिक पातळीवर सुशिक्षित तरुण, कामगार, अधिकारी यांनी सोशल मीडियाद्वारे जनजागृतीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. ह्या माध्यमाद्वारे सुध्दा मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हळूहळू यशस्वी होतांना दिसत आहे.

गावातील काही जणांनी लस घेतली. काही लोक बाकी राहिले तर कोरोनाची साथ कशी आटोक्यात येईल ? या प्रश्नावर सुद्धा भर देऊन लस न घेणाऱ्या बांधवांचे प्रबोधन केले जाते. आरोग्य यंत्रणा उपलब्ध असलेल्या सामुग्रीवर अहोरात्र काम करत आहे. गरज आहे आपण सर्वांनी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याची...! शासन, प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना सामान्य जनतेने साथ देणे आवश्यक आहे. यासह नियमांचे पालन करून आपण नक्कीच कोरोना हद्दपार करू असा विश्वास वाटतो. यासाठी शासनाने लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावी हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. लस घ्यायला इतरांबरोबर आदिवासी समाज बांधव आता तयार होतोय. जनजागृतीमुळे लसीकरणाची जागृती बदल घडवतेय ह्याचा मला आनंद वाटतो.

( लेखक आदिवासी दुर्गम भागातील खेड जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी सुरू केलेल्या जागृतीला प्रचंड यश येत असून आदिवासी भागात लसीकरण जनजागृती होत आहे. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!