उध्वस्त शेतकरी आणि निर्धास्त प्रशासन..! : सततच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यात नुकसानच नुकसान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात आज पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उरली सुरली आशा धुळीला मिळवली आहे. गेल्या काही तासांपासून संततधार सुरूच असून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कहर करीत आहे. अवकाळी पावसाने शेकडो शेतकऱ्यांना भुईसपाट केले असूनही महसूल प्रशासन सुस्त असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. विमा कंपन्या सुद्धा गायब शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसुली अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी कऱ्होळेचे माजी सरपंच पांडुरंग खातळे यांनी केली आहे.

इगतपुरीसह तालुक्यातील अवकाळी पावसाची जोरदार हजेरी शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी ठरली आहे. इगतपुरी शहरासह घोटी, धामणगाव, मुकणे, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पाडळी देशमुख, कऱ्होळे, वैतरणा, साकुर फाटा, सर्वतीर्थ टाकेद आदी परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काल पावसाने रात्रभर कोसळल्यानंतर पहाटेपासून विश्रांती घेतली होती.

धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर, टाकेद अधरवड, खेड, वासाळी परिसरात काल रात्री आणि आज जोरदार पाऊस झाला. पूर्ण भात पिक, धान्य,जनावरांचा चारा यांचे नुकसान झाले. याकडे शासन,अन शासकीय यंत्रणा, विमा कंपनी कोणीच लक्ष देत नाही. शेतकरी पूर्ण चिंताग्रस्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात कृषी मंत्री असून अन जवळच्या जिल्ह्यातील महसूल मंत्री आहेत. मात्र इगतपुरी तालुक्याकडे त्यांचे लक्ष नसल्याची शोकांतिका आहे.

- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!