“मॅन ऑफ दि इअर २०२५” – प्राणपणाने लढणारा इगतपुरीचा संघर्षयोद्धा योगेश चांदवडकर

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – गेली ३० वर्ष सत्तेच्या हुकूमशाहीत इगतपुरी शहराला ५० वर्ष मागे नेवून ठेवणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करणे आवश्यक होते. यासाठी मागील अनेक वर्षांपासून जनतेची जागृती आणि जनतेचे अडलेले नडलेले प्रत्येक काम करण्यासाठी जीवाचे रान केले. हाती सत्तेचे पद नसतानाही विकासाची अनेक कामे केली. लोकांच्या मनातला आणि हृदयातला अस्सल हिरा म्हणून स्थान मिळवले. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत हमखास निवडून येणारे नाव म्हणून दरारा निर्माण केला. पंख कापले म्हणजे भरारी घेता यायला नको म्हणून ऐनवेळी पक्षाची अधिकृत उमेदवारीही कापली गेली. पण जनतेच्या आग्रहाखातर स्वबळावर उमेदवारी केली. साम दाम दंड भेद यांचा वापर त्याच्या विरोधात झाला. मागे वळून पहातांना ह्या बलदंड निवडणुकीत त्याने एकाकी लढा दिला. कोणाचीही साथ नसतांना नागरिकांनी त्याच्या पदरात ९१० मते टाकली. महाबलवान असणाऱ्या दोन उमेदवारांना त्याने कट्टरतेने झुंज दिली. इगतपुरी शहराच्या इतिहासात ह्या योद्धयाचे नाव कायमस्वरूपी कोरले गेले. योगेश संजय चांदवडकर असं ह्या योद्धयाचे नाव आहे. “अंत अस्ति प्रारंभ” प्रमाणे जिथे एक गोष्ट संपते, तिथूनच नवीन गोष्टीची सुरुवात होते. म्हणूनच २०२५ ह्या वर्षाचे “मॅन ऑफ दि इअर” योगेश चांदवडकर असल्याचे इगतपुरीतील नागरिक म्हणतात.

ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर तत्वाला सोडचिठ्ठी न देता प्राप्त परिस्थितीत योगेश चांदवडकर यांनी प्रभाग ६ मध्ये अपक्ष म्हणून एकट्याने लढा दिला. हा नुसता लढा नव्हता दोन बलशाली उमेदवारांचे राजकीय आयुष्य धोक्यात आणणारे निर्णायक युद्ध होते. मोठ्या मोठ्या रक्कमांचे आमिष दाखवून माघार घेण्याबाबत ऑफर आल्या. अफवा, कुटनीती, धनशक्ती वापरून त्याला एकाकी पाडण्याचा डाव टाकण्यात आला. पण हा योद्धा आपल्या निर्णयावर ठामपणे उभा होता. एकट्याने मोठ्या आव्हानांना, अडचणींना किंवा शत्रूंना तोंड देत त्याने एकट्याने संघर्ष केला. जनतेची मिळत असलेली भक्कम साथ हे त्याचे हत्यार ठरले. अपक्ष उमेदवार असूनही नागरिकांनी योगेश चांदवडकर यांना उत्स्फूर्तपणे ९१० मतांचे दान देत एका प्रस्थापित नेत्याला तिसऱ्या क्रमांकावर नेवून फेकलं. निवडून आलेल्या मोठ्या नेत्याची झोपच उडवून टाकत शेवटच्या क्षणापर्यंत संग्राम संपू दिला नाही. दुर्दैवाने लागलेल्या निकालात योगेश चांदवडकरांचा पराभव झाला. मोठ्या दिलदारपणे हा पराभव स्वीकार करीत जनसेवेचे सुरु असलेले काम त्याने अखंडित सुरुही केलं. राजकारणात चांगली आणि वाईट लोकं असतात. आपण चांगले हिरे शोधायची असतात. योगेश चांदवडकर हा एक चांगला हिरा आहे. त्यांच्या लढ्यावरुन अनेकांना निश्चितच प्रेरणा घेता येते. अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी झुंज दिली तर लोकांची साथ नक्कीच मिळते. अंगावर वार झेलत, घाव सहन करीत अन् प्रसंगी घाव घालत अन्यायाविरुद्ध प्राणपणाने लढणारा संघर्षयोद्धा म्हणून योगेश चांदवडकरचे नाव घेतले जाते. पराभवाचीही पर्वा न करता क्षणाक्षणाला संघर्ष करणारा योगेश चांदवडकर २०२५ ह्या वर्षाचा “मॅन ऑफ दि इअर” आहे असे म्हणायला हरकत नाही.

error: Content is protected !!