“मिळून साऱ्याजणी.. करू विकसित गावाची उभारणी” : समृद्ध पंचायत राज अभियान, आदर्श महिला, बाल स्नेही पिंपळगाव डुकरा गावाचा होतोय कायापालट 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून फक्त इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीची आदर्श महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत म्हणुन निवड झालेली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि ॲनिमिया मुक्त गाव मोहीम राबवली जाते आहे. त्याप्रमाणे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत गावाची वाटचाल समृद्धीच्या दिशेने होते आहे. विशेष म्हणजे आदर्श महिला स्नेही व बाल स्नेही ग्रामपंचायत म्हणूनही पिंपळगाव डुकरा हे गाव जिल्हाभरात प्रसिद्ध होऊ लागले आहे. ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर, माजी सरपंच व बचत गट प्रमुख मालन वाकचौरे, आशा सेविका विजया जाधव, बचत गट सखी ज्योती भगत, समूह आरोग्य अधिकारी डॉ. मोरे मॅडम, शिक्षिका रंजना महाजन, अंगणवाडी सेविका सुनीता शिंदे, कल्पना भगत, राजुबाई कुंदे, मदतनीस सुनीता कुंदे, सुजाता झनकर, ग्रामसग अध्यक्ष योगिता वाकचौरे, सचिव प्रिया झनकर आदींनी झपाटून काम करण्याचा केलेला संकल्प पूर्ण होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, विस्ताराधिकारी पडवी, प्रशासक साहेबराव देशमुख यांचे ग्रामपंचायतीला मार्गदर्शन मिळत आहे. “मिळून साऱ्याजणी.. करू विकसित गावाची उभारणी” प्रमाणे संपूर्ण गावातील महिला एकत्र आल्याने पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासह महिला आणि बाल स्नेही ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आली आहे. प्रत्येक घरातील महिला, युवती खऱ्या अर्थाने एकजूट दाखवत असून ग्रामपंचायतीसह शासनाच्या सहाय्याने संपूर्ण गावाचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाली आहे.

महिला सक्षमीकरण व बळकटीला प्रोत्साहन देऊन विविध प्रशिक्षण होत असतात. म्हणूनच ॲनिमिया मुक्त गाव संकल्पना पूर्ण होते आहे. वित्त आयोगाच्या निधीतून बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करून व्यवसायास प्रोत्साहन देण्यात आले. गाय, शेळी पालन, कटलरी दुकान, चहा दुकान, मेस व्यवसायासाठी कर्ज दिल्याने महिलांचे उत्पन्न दुप्पट झाले. महिलांच्या आरोग्यासाठी HB स्ट्रिप्स, औषधे खरेदी, बियाणे देऊन २०० परसबाग लागवड आणि व्यवसाय प्रशिक्षणही घेण्यात आले. वेळोवेळी महिला सभेद्वारे महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली जाते. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हेल्पलाईन नंबरचे पोस्टर लावले गेले आहेत. महिला व बालकांसाठी अंगणवाडी, आरोग्य केंद्रात ॲनिमिया मुक्त पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात येतो. सर्व महिलांची नावे घराच्या उताऱ्यावर लावण्यात आली आहेत. घोषवाक्य, गायन, चित्रकला स्पर्धेत महिलांच्या सहभागाने घोषवाक्य तयार करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी ५३ सौर पथदीप आणि १० हजार वृक्षलागवड करण्यात आली. लिंग आधारित हिंसाचाराचे निराकरण, प्रवचन, बालविवाह प्रतिबंध प्रशिक्षण, भ्रूण निवडीचे प्रश्न व निराकरणासाठी पेंटिंग, प्रवचन, दवंडी, प्रशिक्षण, बॉल पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात आले. बचत गटासाठी ग्रामसंघ बांधकाम, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधून मुलींसाठी डिस्पोझर मशीन बसविले. लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे सुद्धा बांधण्यात आले आहेत.

error: Content is protected !!