काउंटडाऊनची धकधक आणि निकालाची धाकधूक : इगतपुरीत तर्क वितर्क व अंदाजांना उधाण ; ढोलताशे सज्ज 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे तास उरले आहेत. उद्या रविवारी सकाळी इगतपुरीच्या शासकीय आयटीआयमध्ये ही मोजणी केली जाणार आहे. १०० अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी असून १० प्रभागासाठी १० स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे. उमेदवाराला त्यांचा एक प्रतिनिधी देता येणार आहे. पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी ढोल–ताशे, बँजो, फटाके आणि गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे. २ डिसेंबरला मतदान झाले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार मतमोजणी उद्या रविवारी २१ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे उमेदवारांना अनेक दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागली. कडाक्याच्या थंडीतही ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. थंडीतही पोलीस पहाऱ्याची चोख व्यवस्था कायम आहे. निकालासाठी काही तास उरल्याने उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शालिनी संजय खातळे, राष्ट्रीय काँग्रेसच्या शुभांगी यशवंत दळवी, भारतीय जनता पक्षाच्या मधूमालती रमेश मेंद्रे वंचित बहुजन आघाडीच्या अपर्णा चंद्रशेखर धात्रक यांच्यात थेट लढत झाली आहे. नगरसेवकपदासाठीही सर्व प्रभागांत चुरशीची लढत झाल्याने सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. पक्षीय आणि वैयक्तिक करिष्म्यामुळे कोण किती मते खेचतो, यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही शेकोटीभोवती राजकीय चर्चांना ऊत आला आहे. कार्यकर्ते आणि नागरिक आपापले अंदाज मांडण्यात मग्न असून, काही ठिकाणी तर पैजाही लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे भर थंडीठी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

error: Content is protected !!