आषाढी एकादशी विशेष : पंढरपूरची वारी म्हणजे मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ

लेखन : भास्कर बबन सोनवणे
संपादक इगतपुरीनामा

महाराष्ट्रातील वारकरी परंपरेसह सर्वांच्या मनात अद्वितीय, अद्भूत, अविस्मरणीय असलेली पंढरीची वारी म्हणजे मूल्य शिक्षण, नीतिमूल्ये आणि व्यवस्थापन अभ्यासाचा अनमोल खजिना आहे. आषाढी एकादशीनिमित्त परम परमात्मा पांडुरंगाच्या मनोहर दर्शनासाठी आसुसलेले लाखो लोक नितीमूल्यांच्या परंपरेचे सुद्धा वारकरी आहेत. अभूतपूर्व असणारा पंढरपूरचा मेळा व वारी जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवली तर “हे विश्वची माझे घर” ही व्यापक विचारधारा मनामनात कायमची रुजली जाते. भरकटत चाललेल्या समाजाला आणि नितीमूल्यांच्या ऱ्हासाला जागेवर आणून स्वयंशिस्त लावणारी पंढरीची वारी जगभरात अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय ठरली आहे. नितीमूल्य, व्यवस्थापन ह्या वैशिष्ट्यांनी व्यापलेली पंढरीची वारी ह्या विषयांचे विद्यापीठ ठरते आहे.

वारी म्हणजे पंढरपुरापर्यंत विठ्ठल नामसंकीर्तन करीत करीत शेकडो कि.मी.चा केलेला पायी प्रवास. पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय,अवर्णनीय,अतुल्य व अद्भूत असते. कारण लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देता भक्तिभावाने वारीत सामील होतात. ह्या वारीला ७०० पेक्षा जास्त वर्षांचा मौलिक इतिहास परंपरा लाभलेली आहे. स्वयंशिस्त, सौहार्द, सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या ह्या नितीमूल्यांवर पंढरीची वारी चालते. वारीत जपलेली कमालीची शिस्त, भक्तीभाव, एकरूपता, निश्चलता, सौहार्द, समर्पण आणि शरणागती ह्या नितीमूल्यांचेही सर्व श्रेय तमाम वारकरी माउलींना द्यावे लागेल.

वारीत लाखो वारकरी शिस्तीत टाळ मृदुंग वाजवीत ४-४ च्या समूहाने एकामागे एक चालत असतात. इतरवेळी अरेरावी करणारे पोलीसही त्यांना ”माउली” म्हणून संबोधतात. एका बाजूला लाखो वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात व अंगावर, पाठीवर वा हातात घेवून चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाहीतर रस्त्यावरच दुपारचा रात्रीचा विसावा घेतात दिवसा व संध्याकाळी मुकाम्मी काहीजण भजन कीर्तन करत दंग असतात तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात. काहीही कटकट न करता स्वतःहून हे सर्व करतात. जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक कारणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत तर हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून ‘ब्र’ काढत नाही. हे सर्व अद्भूत, अद्वितीय नितीमूल्यांचे प्रतीक आहे. वारीतील लोक एकमेकांना ”माउली” म्हणून संबोधतात.

देवापेक्षाही मातृपितृ सेवेला प्राधान्य देणाऱ्या पुंडलिकासाठी युगानुयुगे विठ्ठल उभा आहे. हे मातृपितृभक्तीचे प्रतिक सहजच मूल्यशिक्षण देऊन कृतज्ञतेची उत्कटता निर्मित करते. पुंडलिकाच्या आदर्शाचे मूल्य शिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होण्याची क्रिया वारीत सहज घडते. आपोआप घडणारे सत्कार्य वारीत प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते. अध्यात्म, भक्तीभाव आणि पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचे प्रतिक म्हणून प्रतिष्ठीत पावलेल्या विठोबाच्या दर्शनाच्या ओढीमुळे हे घडते. अशिक्षित, अज्ञान वारकऱ्यांची आध्यात्मिक जाण व ज्ञान प्रेरक आहे. हजारो ट्रक, बसेस, पाण्याचे टँकर, चहावाले, चांभार, कपडेवाले, फळ विक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा व बाजारी संपत्ती निर्माण करण्याचा स्त्रोत पंढरीची वारी आहे.

वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. वारीत जवळ जवळ १० लाख वारकरी वय, जात-पात, लिंगभेद, दर्जा, हुद्दा न मानता पंढरपुरी येतात. त्यापैकी २-३ लाख वारकरी पाऊस-पाणी, ऊन-वारा इ. गैरसोईची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता. सगळ वातावरण विठ्ठलमय झालेले असते.

एकंदरीत पंढरीची वारी मानवी जीवनासाठी उपयुक्त नीतिमूल्ये रुजवणारी निर्मळ गंगा आहे. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी सध्याच्या काळात ह्याची आत्यंतिक निकड आहे. ”पेरिले तेच उगवते” या न्यायाने वारीमध्ये झालेली योग्य पेरणी उद्याचा सक्षम समाज उभा केल्याशिवाय राहणार नाही. पंढरीच्या वारीचा अभ्यास म्हणजे सागरातून कितीही पाणी उपसले तरी सागर मात्र कधीच कमी पडणार नाही असा आहे. यामधून मिळालेली नीतिमूल्ये नेहमीच रुचेल, पचेल आणि टिकेल ह्या त्रिसूत्रीप्रमाणे मिळत राहतील ह्यात संशय नाही.

सदरचे लेखन नाशिक येथील दै. देशदूत ह्या दैनिकात रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध झालेले आहे. वाचकांसाठी प्रसिद्ध झालेल्या खालील लिंकवरून सुद्धा लेख वाचता येईल.

https://www.deshdoot.com/features/ashadi-special-value-education-and-management-in-wari

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!