
इगतपुरीनामा न्यूज – सध्या सुरू असलेल्या इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या संपूर्ण इगतपुरी शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. गिरणारेपासून वाहतूक संथ झाली असल्याचे दिसते. उमेदवारांच्या प्रचारसभा, पदयात्रा आणि रॅलींमुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासह प्रचाराची वाहने, प्रचाराच्या रिक्षा, कर्कश आवाजातील भोंग्यांचा आवाज यामुळे वाहतूक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर इगतपुरीच्या बाहेरील लोकांची वाहने शहरात दाखल होत असल्याने यामध्ये भर पडत आहे. परिणामी नागरिकांना कामावर जाण्यास किंवा इतर अत्यावश्यक कामांसाठी वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. व्यापारी बांधव आणि सामान्य इगतपुरीकर प्रचंड कंटाळले असून संतापले असल्याचे भयानक चित्र आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग नसल्याने राजकीय पक्षांनी नियोजित मार्गांवरच रॅली काढण्याचा आग्रह धरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. राजकीय पक्षांनी अशा रॅली काढू नयेत, ज्यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतील अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. आधीच अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या समस्या निवडणूक प्रचारामुळे अधिकच वाढल्या आहेत. निवडणूक काळात लोकप्रतिनिधींनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रचाराचे नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.