
इगतपुरीनामा न्यूज – जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेने एकत्र येत निवडणुकीत दमदार पाऊल टाकले आहे. ही महायुती केवळ राजकारणासाठी नाही, तर इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी केले. फिरोजभाई पठाण म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, पथदिवे, नागरिकांसाठी आवश्यक असलेली मूलभूत सोयी सुविधा यांचा दर्जा उंचावण्यासाठी मजबूत व स्थिर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत विकास आराखडा तयार करण्यात येत असून, महायुतीकडे अनुभवी नेतृत्व, निधी आणण्याची क्षमता आणि अंमलबजावणीचा वेग असल्याचे त्यांनी नमूद केले. इगतपुरीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली ही युती शहरातील प्रत्येक प्रभागात जनसंपर्क करून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत आहे. “जनतेचा विश्वास हेच आमचे बळ. इगतपुरीला पुढील पाच वर्षांत मॉडेल शहर बनवणे हा आमचा उद्देश आहे.” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरोजभाई पठाण यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगराध्यक्ष उमेदवार शालिनी संजय खातळे आणि अन्य प्रभागातील सर्व अधिकृत उमेदवार विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.