
लेखन : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ
अवघ्या ४० वर्षाचा बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. एवढ्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. ही बातमी अगदीच अनपेक्षित आणि तेवढीच धक्कादायक. इतका तरुण, शारिरीक तंदुरुस्त असणाऱ्या अभिनेत्याचे हार्ट अटॅकने निधन व्हावे यावरून स्पष्ट होते की कधी आपले श्वास थांबतील आणि कोणत्या क्षणी आपण या सुंदर जगाचा निरोप घेऊ याची काहीच शाश्वती राहिली नाही. या प्रश्नाने सर्वांच्या मनात कल्लोळ माजला आहे. सामान्यतः हार्ट अटॅक वयाच्या 60 वर्षानंतर येतो असेच वाटतं होते. परंतु आजकाल तरुण पिढीमध्ये ही याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे सांगणारी ही घटना आहे.
हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येतो त्यावेळी ऑक्सिजनद्वारे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. परिणामी दिवसरात्र काम करणारे हृदयाचे स्नायू कोलमडून पडतात. नेहमी धडधडणारे हृदय काम करेनासे होते. असा झटका येण्यापूर्वी अनेकांना काही लक्षणे जाणवतात तर काहींना कोणतीच पूर्व लक्षणे जाणवत नाहीत. छातीत दुखणे, शरीराच्या वरच्या भागात दुखणे, घाम येणे, मळमळ, थकवा, श्वास घ्यायला त्रास होतो. ही प्रमुख लक्षणे आहेत. अनुंवशिक आजार असेल लहान वयात हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. धूम्रपान, वाढलेले कोलेस्टरॉल, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, आहार आणि मद्यपान, ताण यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करायला हवे ?
हृदयविकारास कारणीभूत होणार्या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते. ज्यामुळे हा विकार वाढीस लागतो त्यांना रिस्क फॅक्टर्स म्हणतात. त्यापैकी बरीच कारणे टाळता येण्यासारखी असतात.
स्निग्धाहार
आपल्या आहारात चरबीयुक्त, स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास ती रक्तात कोलेस्टेरॉल व त्यासारखी इतर द्रव्ये वाढतात. त्यांचा थर रोहिण्यांच्या आतील मुलायम भागावर जमू लागतो. रोहिण्यांची पोकळी कमी कमी होऊ लागते. शरीरातील अवयवांच्या रक्तपुरवठ्यात घट पडू लागते. इतर अवयवांच्या मानाने हृदय आणि मेंदू कितीतरी अधिक नाजूक आहेत. त्यांना जरासुद्धा प्राणवायूचा व पोषणाचा तुटवडा सोसत नाही. परिणामी स्निग्धताप्रधान आहार हा धोकादायक बनतो. म्हणून हृदयरोग झालेल्या, होण्याचा संभव असलेल्यांनी आपल्या रक्तातील चरबीचे प्रमाण तपासून घेणे आवश्यक आहे.
रोज व्यायाम करणे
शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या माणसांपेक्षा बैठे काम करणाऱ्यांत हृदयविकाराचे प्रमाण जास्त आढळते. व्यायामाचा अभाव असलेल्या व्यक्तीच्या शरीराची कार्यक्षमता कमी असते. कोणतेही शारीरिक काम करताना अशा व्यक्तींच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग जास्त वाढतो व थकवा लवकर येतो. त्यांच्या रक्तात चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांना ॲथेरोस्क्लेरोसिसचा विकार होण्याची, हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा येण्याची, रक्ताची गाठ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा वाढते. नियमित व्यायाम केल्याने हे सर्व दुष्परिणाम टाळता येतात. नियमित व्यायाम तब्येतीला नक्कीच फायदेशीर असतो. व्यायामाचा अतिरेक आणि कधीतरी केलेला व्यायाम अपायकारकसुद्धा ठरू शकतो. ज्यांना व्यायामाची सवय नाही त्यांनी थोड्या व्यायामाने सुरुवात करून हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे.
धूम्रपान टाळावे
धूम्रपान करणाऱ्यांत हृदयविकाराचे प्रमाण इतरांच्या तुलनेने दुप्पट ते तिप्पट आढळते. तंबाखूतील निकोटीन या घटकामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, रक्तातील चरबी वाढते, तिचे रक्तवाहिन्यामधील थर वाढतात व रक्त गोठण्याची प्रवृत्तीही वाढते.
अतिमद्यपान टाळावे
दररोज थोड्या प्रमाणात एक ते दीड पेग मद्यपान केल्यास रक्तातील अपायकारक चरबी कमी होऊन एच. डी. एल. कोलेस्टेरॉल या लाभदायक घटकाचे प्रमाण वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे. पण अति मद्यपानामुळे शरीरातील इतर अवयवांवर होणारे अनिष्ट परिणाम व व्यसनाधीनतेची शक्यता लक्षात घेता दररोज मद्यपान अनिष्ट ठरते.
मानसिक ताण कमी करणे
जी माणसे स्वभावाने उतावळी, अति महत्वाकांक्षी, जास्तीत जास्त गोष्टी मिळविण्यासाठी आसुसलेली, लवकर चिडणारी व रागावणारी असतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकार झालेल्यांनी मानसिक तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर नियंत्रण
या दोन्ही विकाराच्या रोग्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. यापैकी कोणताही विकार असणाऱ्यांनी त्यावर नियमित उपचार करवून घेणे आवश्यक ठरते. मधुमेहीप्रमाणेच काही व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा विकार असूनसुद्धा त्याची काहीही लक्षणे दिसत नाहीत, किंवा त्रास होत नाही. म्हणून नियमित औषधोपचारांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.
ध्यान धारणा
याशिवाय रागावर नियंत्रण आणण्यासाठी नियमित योगा आणि ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. अति रागीट व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान दहा मिनिटे न चुकता ध्यान करा
अति स्पर्धा टाळा
रोजच्या धावपळीच्या जीवनात व्यक्तीला स्वतः कडे लक्ष देण्यासाठी वेळच भेटत नाही. सतत पुढे जाण्याच्या इर्षे पोटी व्यक्ती सतत बैचेन, अस्वस्थ असते. मानसिक स्वास्थ गमावून बसते. म्हणुनच समाधानी वृत्ती आत्मसात करा. रोज झोपण्याआधी 10 मिनिटे ध्यान केल्याने मानसिक ताण आणि शारिरीक ताणही कमी होऊन शरीर शिथिल होईल.
दिवस रात्र न थकता आपले काम इमाने इतबारे करणाऱ्या हृदयाचे लाड करायला शिका. काही गोष्टी आपल्या हृदयाला मानवत नाही हे लक्षात घ्या. त्यानुसार आपले खाण्या पिण्याचे वेळापत्रक पाळा. प्रत्येकाचे मरण अटळ आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला निश्चित वेळ असते. ते येणारच आहे परंतु उद्याचे मरण आज ओढून घेऊ नका. स्वतः साठी नाही तरी निदान त्या व्यक्तींसाठी ज्यांचे तुम्ही भविष्य आहात, आधार आहात, जगण्याचे कारण आहात. तरुण वय हे काही जग सोडुन जाण्याचे वय नाही. मरण खूप सोपे असते परंतु जगणे तितकेच कठीण. आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे दुःख पचविणे कठिण असते. म्हणूण आपल्या व्यक्तींसाठी आणि आपल्या हृदयासाठी स्वतःची काळजी घ्या.
शेवटी हे जीवन सुंदर आहे आणि ते एकदाच मिळते.
लेखिकेचा संपर्क क्रमांक 9011720400
असून त्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत.