
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे ते इगतपुरी दरम्यान महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गालगत दोन्ही बाजूला महामार्गाच्या हद्दीत असलेले अतिक्रमण काढण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमण धारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्याने आज रस्त्यालगत असलेले हॉटेल, धाबे, दुकाने यांनी केलेले अतिक्रमण नाशिकहून मागविलेल्या पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रूट पेट्रोलिंग टीम आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यास सुरुवात झाली आहे. या कारवाईमुळे महामार्गाने मोकळा श्वास घेतला असून रस्त्यावर मनमानीपणे वाहने उभे करणाऱ्या वाहनधारकांनाही यामुळे चाप बसणार आहे. वाहतूकीची कोंडी रोखवून संभाव्य अपघातांना आळा बसणार आहे. लवकरच या महामार्गाच्या सहापदरी करणास सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.