
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी कॉग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेनेची महायुती आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून प्रशासनाला हाती धरून आमचे उमेदवार व कार्यकर्ते यांना धमकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा संशय आहे. या प्रकारच्या घटना यापुढे होऊ नये. इगतपुरी नगरपरिषद निवडणूक भयमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पाडावी. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, शिवसेना धनुष्यबाण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, प्रशांत कडू, देविदास जाधव, इगतपुरी शहर संपर्कप्रमुख संजय खातळे, विनायक पाटील, अमोल बोरावके यांनी केली आहे. याबाबत नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी नाशिक यांना तक्रार अर्ज पाठवण्यात आला आहे. कार्यकर्ते अमोल बोरावके यांच्या घरी काहीही कारण नसतांना दुपारी पोलिसांच्या वेशातील दोघेजण येऊन त्यांची चौकशी करीत होते. याबाबत स्थानिक इगतपुरी पोलिसांना काहीही माहित नाही. असे प्रकार यापुढे होऊ नये म्हणून योग्य तो तपास करून संबंधितांना समज द्यावी असे तक्रारीत म्हटले आहे.
