
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – सामान्य माणसांचे आणि आदिवासी ग्रामस्थांचे जीवनमान सदृढ आणि सर्वांगीण व्हावे यासाठी अनेकानेक प्रयत्न करता येणे शक्य आहे. मात्र आतापर्यंत कोणीही या प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न केलेले नाही. ग्रामविकास, मूलभूत योजना, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात अद्यापही उन्नती साधली गेली नाही. लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतांना याबाबतच्या संवेदना समोर ठेवून काम उभे केले. सामान्य माणूस आणि आदिवासी नागरिक यांना सामाजिक न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याचा निश्चय केला आहे. येत्या निवडणुकीत खंबाळे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करून सर्वांच्या विकासाचे स्वन साकार करायचे आहे असे प्रतिपादन त्रिंगलवाडी पारदेवीचे लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे यांनी केले. खंबाळे जिल्हा परिषद गटात उमेदवारी करून प्रत्येक गावाला विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची ग्वाही देतो असे ते म्हणाले. मतदारांना गृहीत धरून आणि विविध आश्वासने देऊन भुलभूलैया उभा करण्यात आला. मात्र आढावा घेतला तर खरोखर लोकांना वेड्यात काढले गेले. हे चित्र बदलवण्यासाठी खंबाळे गटातून नक्कीच विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अशोक जेठू पिंगळे हे खंबाळे गटातील कार्यकुशल लोकनियुक्त सरपंच असून त्यांनी त्रिंगलवाडी पारदेवी ग्रामपंचायतीत अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. कोरोनाच्या भयानक काळात नियोजनबद्ध काम करून त्यांनी गोरगरीब ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने चांगले काम काय असते याची प्रचिती दिली. सर्वसमावेशक लोककल्याणाची कामे त्यांनी केली. ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अतिशय महत्वाची कामे करून लोकांचा विश्वास संपादन केला. पाण्यासारखा महत्वाचा विषय रोटरी क्लब यांच्याद्वारे सोडवून वाड्या वस्त्या विकसित केल्या. प्रत्येक समाजघटक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या गरजेनुसार साहित्याचे वाटप केले. खंबाळे गटातील प्रत्येक गावात चांगला संपर्क आणि समाजकार्यात मनापासून सहभाग घेतला. शिक्षणाच्या मार्गानेच उन्नती होऊ शकते हे ध्यानात घेऊन प्रत्येक शाळांसाठी अशोक पिंगळे यांनी भरीव काम केलेले आहे. शैक्षणिक समृद्धी साधली तर ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात येईल यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आतापर्यंतच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी स्वतः जिल्हा परिषदेच्या खंबाळे गटातून उमेदवारी करणार आहे. हा गट नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा मी संकल्प केला आहे. ह्या गटातील ग्रामस्थांनी या निवडणुकीत मला अधिकाधिक मतांनी जिल्हा परिषदेत पाठवावे अशी अपेक्षा अशोक जेठू पिंगळे यांनी शेवटी व्यक्त केली.