इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड व अक्षर मानव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड येथे महिलांसाठी सोशल मिडिया डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न झाला. महिलांनी आपल्या उद्योग व्यवसायाला गती देण्यासाठी सोशल मिडियाचा वापर कसा करावा, यातून आपला व्यवसाय कसा वाढवावा यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजक जिजाऊ ब्रिगेड नाशिक शहराध्यक्षा अश्विनी पवार पाटील यांनी प्रास्ताविकातून जिजाऊ ब्रिगेड करत असलेल्या कार्याची माहिती दिली. महिलांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड कौशल्य विकास उपक्रम संपूर्ण शहर जिल्हाभर राबवणार असल्याचे सांगत जिजाऊचे संस्कार घराघरात नेण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडमध्ये सर्वांनी सक्रिय व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा व अन्यायाविरुद्ध लढा यासाठी जिजाऊ ब्रिगेड महिलांसाठी देशभरात काम करत आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना गती देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग उपक्रमाचा विशेष फायदा महिलांना झाला. जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात जिजाऊ ब्रिगेड शहरभर संघटन बांधणीसाठी प्रयत्न करणार असून महिलांनी सहभागी व्हावे.
- अश्विनी पवार पाटील शहराध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नाशिक
अक्षर मानव संस्थेच्या व जिजाऊ ब्रिगेड रोजगार मार्गदर्शक ज्योती भोसले लांडगे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विविध गुणवैशिष्टांचा दाखला दिला. कठीण काळात जिजाऊंनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केले त्या पद्धतीने महिलांनी आपल्या उद्योग व्यवसायाला कठीण परिस्थितीतून पुढे नेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. येणारा काळ स्पर्धेमुळे कठीण असला तरी त्यातून महिला जिजाऊचा आदर्श घेऊन पुढे जातील असे सांगत कौशल्य विकास साधणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचे फायदे तोटे सांगत जगभरात आपला उद्योग व्यवसाय नेण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग प्रभावीपणे करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध मान्यवरांनी फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप, फेसबुक पेज, यु ट्यूब याविषयी विविध प्रकारे मार्गदर्शन केले. अनेक महिलांनी यातून फायदा झाल्याचे सांगत जिजाऊ ब्रिगेडचे आभार मानले. ज्योती भोसले लांडगे यांचा महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल शहराध्यक्ष अश्विनी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांना यावेळी जिजाऊ वंदना पत्रिका भेट देण्यात आली.
यावेळी संगीता देठे, हर्षदा शेळके, जया मोरे, सविता पवार, पल्लवी मोरे, आरती आहिरे, मनीषा भालेराव, सायली कारले, जयश्री बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. आभार जिजाऊ ब्रिगेडच्या संघटक उद्योजिका मनीषा नेरे यांनी मानले.