
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडुन इच्छुकांची वाढती संख्या मोठी आहे. मात्र गत विधानसभेला निवडणुक लढविलेले वाडीवऱ्हे गटातील गोंदे दुमाला येथील उच्च शिक्षित डॉ. शरद तळपाडे यांची भारतीय जनता पक्षाच्यावतीने उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी वाडीवऱ्हे गटात भाजप पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दौरा सुरू केला आहे. उच्चशिक्षित व व्यवसायाने डॉक्टर असल्याने गटातील जनतेशी असलेली त्यांची जवळीक ही त्यांची व पक्षाची जमेची बाजु म्हणुन याकडे बेरजेचे गणित म्हणूनही पाहिले जात आहे. डॉ. शरद मंगलदास तळपाडे हे व्यवसायाने डॉक्टर असुन गोंदे दुमाला येथे ओम साई हॉस्पिटलच्या माध्यमातून ते देवदूत म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना वाडीवऱ्हे गटात प्रथम पसंती दिली गेली आहे. भाजपातर्फे त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत त्यांना पाठवण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरु झाले आहे.
नाशिकच्या वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. उच्चशिक्षित व अभ्यासु म्हणुन डॉ. शरद तळपाडे हे डॉक्टरी पेशामुळे जनमानसात परिचित आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात गोंदे दुमाला येथे अल्पदरात आवश्यक ते उपचार देऊन कोरोनाग्रस्तांना जीवदान देण्याबरोबरच मानसिक आधार देऊन बरे केल्याने अनेकांना याचा मोठा फायदा झाला आहे. दवाखाना म्हटले तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही परंतु कोरोनासारख्या महामारीत त्यांनी रुग्णांना दिलेली सेवा यामुळे त्यांची प्रत्येक रुग्णाच्या कुटुंबाशी जवळीक वाढलेली आहे. निवडणूका येतात जातात मात्र ग्रामीण जीवनातील समस्या, धरणग्रस्तांचा प्रश्न, रोजगार यासह अनेक प्रश्न आ वासून उभेच आहेत. इगतपुरी तालुक्यातील बहुतांश जमिनी या शासकीय प्रकल्पांसाठी संपादित झाल्या आहेत. आणि अजूनही अनेक प्रकल्पांसाठी संपादन सुरूच आहे. त्यात वाडीवऱ्हे गटातील जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित होत असतांना स्थानिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र यावर कुणी ठोस आवाज उठवित नाही किंवा उठणाऱ्या आवाजाला कुणाचे बळही मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. मात्र सर्वसामान्य जनतेच्या, धरणग्रस्त व विविध प्रकल्पांमध्ये जमिनी देऊन भूमिहीन होऊ पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित करून न्याय मिळवून देऊ असे अभिवचन डॉ. शरद तळपाडे यांनी सांगितले.