
इगतपुरीनामा न्यूज – नगरपरिषद निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र प्रत्यक्ष ऑनलाईन भरले गेले नाही. नामनिर्देशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नामनिर्देशन पत्र, शपथपत्र भरायचे आहे. त्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करायची आहेत. पुढील सर्व प्रक्रिया ऑनलाईनच पार पडणार आहे. कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात वाहने आणण्यास सक्त मनाई असेल. फक्त उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि सूचक यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नजर आणि व्हिडिओ शूटिंग सुरू आहे. 24×7 डिजिटल देखरेखीची सुविधा उपलब्ध आहे. नामनिर्देशनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी निश्चित करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी पोलीस बंदोबस्त आणखी वाढवला जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, ५ डेस्क कार्यान्वित केले आहेत. त्यात १. हेल्प डेस्क – उमेदवारांना आवश्यक विविध फॉरमॅट्स, जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, नगरपालिकेचा ठेकेदार नसल्याचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी. २. मतदार यादी डेस्क – उमेदवारांना व सूचकांना मतदार यादीची प्रमाणित प्रत मिळावी व तपासणीसाठी मदत व्हावी म्हणून. ३. अनामत रक्कम डेस्क – ‘क’ वर्ग नगरपालिकेसाठी सर्वसाधारण जागेसाठी रु. १०००, राखीव जागेसाठी रु. ५०० अशी अनामत रक्कम स्वीकारण्यासाठी व्यवस्था. ४. प्राथमिक छाननी व सुरक्षितता व्यवस्था – नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक छाननी प्रभागनिहाय केली जाणार आहे. लहान चुका किंवा अपूर्ण माहिती असल्यास त्वरित उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक वॉर्ड, नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अधिकारी दिले आहेत. छाननीनंतर नामनिर्देशन पत्रांना क्रमांक देऊन नोंदणी केली जाईल. आचारसंहितेसाठी भरारी पथके, एसएसई आणि व्हीएसटी पथके तैनात आहेत. सर्व संबंधित मनुष्यबळाची तयारी पूर्ण असून प्रशिक्षणे सुरु आहे. मतदान यंत्र प्राप्त झाले असून त्यांची तपासणी सुरू आहे. उमेदवारी अंतिमनंतर मतदान यंत्रांची अंतिम तयारी केली जाईल. सर्व परवाना कक्ष सुरू झाले आहेत. अर्जदारांना त्याच दिवशी परवाना देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी आरटीओ, पोलीस प्रशासन, नपा कर्मचारी असे प्रत्येक विभागातील अधिकारी नेमलेले आहेत. “एक खिडकी योजना” अंतर्गत उमेदवारांना एनओसी आणण्याची गरज न पडता परवाने सहज मिळतील. तहसीलदार बारवकर यांनी सांगितले की, ही निवडणुक भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणार आहोत.