
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्व गट आणि गणात इंदिरा काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. इगतपुरी त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीतही स्वतंत्र लढा देण्याचे ठरवण्यात आले आहे. गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना ( उबाठा ), राष्ट्रवादी (शप ) या प्रमुख पक्षांनी अन्य उमेदवारांना सहकार्य करून आघाडीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांनाही त्यांची जागा दाखवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष समर्थ आणि सक्षम उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी एकाकी पाडूनही काँग्रेसने २ माजी आमदारांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर नेवून ठेवले. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील निवडणुकीसाठी योग्य उमेदवार उमेदवारी मिळण्याच्या संपर्कात असून योग्यवेळी नावे घोषित केली जातील. पैशाच्या जोरावर उमेदवारांवर दबाव, गुंडगिरी आणि पळवापळवी होऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष काळजी घेत आहे. या निवडणुकीत आघाडीधर्म न पाळणाऱ्यांचा वचपा काढून पळता भुई थोडी करू असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते लकीभाऊ जाधव यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आपली सर्व शक्ती पणाला लावून अत्यंत बिकट काळात पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आणणारे काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनीही लकीभाऊ जाधव यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. परिणामी इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील जि. प. पं. स. आणि नप निवडणुकीत चांगलाच रंग येणार आहे.
तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी राजकीय पार्श्वभूमी मांडली. २०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने आदिवासी विकास परिषद आणि काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर प्रसिद्ध असणारा आक्रमक युवा चेहरा लकीभाऊ जाधव यांना उमेदवारी घोषित केली. अपेक्षेनुसार खुद्ध तालुका काँग्रेसमधून ह्या नावाला कमालीचा विरोध झाला. यावेळी तत्कालीन उबाठा शिवसेनेच्या नेत्या असणाऱ्या माजी आमदारांनी प्रखरपणे विरोध करीत आपल्या सोबत उरलीसूरली काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी (शप ) घेऊन बंडखोरी केली. काँग्रेसने अनंत अडचणी, समस्यांचा डोंगर, लोकांमध्ये हसू, सगळी महाविकास आघाडी अपक्षाकडे गेलेली आणि फजिती पाहायला टपलेले लोकं याचा विचार केला नाही. एकाकी काँग्रेसने माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ यांना तीन आणि चार नंबरवर फेकत दुसरा क्रमांक गाठला. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला पक्ष असून मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा स्वतंत्र पक्ष असल्याचे श्री. धांडे म्हणाले. इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघातआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने अनेकांचे राजकीय आयुष्य घडवणार आणि बिघडणार आहे. इंदिरा काँग्रेसची मते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती ठरवण्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहेत ही काळ्या दगडावरची न पुसणारी रेषा आहे असेही काँग्रेस नेते लकीभाऊ जाधव यांनी शेवटी सांगितले.