“सहन होत नाही अन सांगताही येत नाही” : जि. प. पं. स. निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील प्रस्थापितांची अवस्था

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दीपावली पर्व जवळपास संपले असले तरी आता इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची बहुरंगी दिवाळी लवकरच सुरु होणार आहे. ५ गट आणि १० गणांतील सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली दिसते. दिवाळी काळात अनेकांनी बॅनरबाजी करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात ते उतरतील असे स्पष्ट झाले. मात्र मातब्बर इच्छुक उमेदवारांनी मात्र दिखाव्यापेक्षा आतून मोर्चेबांधणी करायला प्राधान्य दिले. त्यांच्याकडून एकंदरीत संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहून सोयीस्कर भूमिका घेतली जाईल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांत स्वतंत्र लढा देण्याची विचारधारा आहे. त्यामुळे बहुरंगी संग्रामाला सामोरे जावे लागेल. उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षांतरे आणि बंडखोऱ्या मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. विधानसभा निवडणूक काळात आपल्या आपल्या उमेदवारासोबत काम करणारे सर्वपक्षीय नेते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दिसू शकतील. माजी आमदार, माजी सभापती उपसभापती, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ह्या निवडणुकीत उतरतील असे संकेत आहेत. 

घोटी जिल्हा परिषद गटात सर्वच पक्षांकडे मातब्बर इच्छुकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. जुने दुखणे, वचपा, शह प्रतिशह आणि व्यक्तीदोषाचे राजकारण ह्या गटात तोंड वर काढू लागले आहे. उमेदवार निश्चित करण्याचे काम पक्षाच्या नेत्यांना डोकेदुखीचे होऊन बसल्याचेही कळते. ह्या गटातील उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी घोषित करून बंडखोऱ्या टाळण्याचा पक्षांचा कल असला तरी ह्या गटामुळे प्रत्येक पक्षाला चांगलाच वैताग सोसावा लागू शकतो. यापुढील प्रत्येक निवडणुकीत ह्या गटातील चुरशीच्या राजकारणामुळे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गटाच्या बाहेरील नेत्यांचा ह्या गटात हस्तक्षेप वाढल्याने इथली लढत अजिबात सोपी जाणार नाही. घोटी गणातून निवडून आल्यावर थेट पंचायत समितीचे सभापती लाभणार असल्याने अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसते. प्रचंड चुरसीचा सामना करून ही निवडणूक जिंकायचीच यासाठी डोळ्यात तेल घालून इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. मुंढेगाव गणातून ओबीसी महिला आरक्षणाचा फायदा घेऊन अनेकांनी तयारी केली आहे. भेटीगाठी, बैठका आणि संपर्काचे अभियान राबवून जनतेचा कौल तपासला जातोय. घोटी गट, घोटी गण आणि मुंढेगाव गण यातील उमेदवार निवड करतांना जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून विजयाची पताका फडकवता येणार आहे.

वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातूनही प्रत्येक पक्षांकडे इच्छुक उमेदवारांचा आकडा वाढलेला आहे.माजी आमदार, माजी सभापती, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह काही वर्षांपासून तयारी केलेले रथी महारथी ह्या गटातून नशीब अजमवातील. एकाच गावात इच्छुकांची संख्या वाढल्याने त्या त्या गावात पेचप्रसंग उभा राहिला आहे. कोणीतरी एकानेच निवडणूक लढवून गावाची अडचण सोडवा यासाठी सर्वांना साकडे घातले गेले आहे. तथापि याला यश मिळेल असे वाटत नाही. वाडीवऱ्हे आणि साकुर गण सर्वसाधारण असल्यामुळे प्रत्येक गावातून संभाव्य उमेदवार वाढले आहेत. संपर्क वाढवण्यासाठी गावोगावी संबंधितांनी कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. दोन्ही गणांच्या उमेदवार निश्चितीवर गटाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. कायमच चर्चेत असणारा खंबाळे गट जिंकण्यासाठी तुल्यबळ नेते आतुर झाले आहेत. हा गट आदिवासी राखीव झाल्याने अनेकांना संधी लाभणार आहे. मात्र इथेही प्रचंड राजकारण आणि चुरसीची निवडणूक झाल्याशिवाय राहणार नाही. कावनई गण सर्वसाधारण राखीव असल्याने ह्या भागातील अनेक वर्ष संधी हुकलेले नेते निवडणुकीत नशीब अजमावतील. उमेदवारी मिळवण्यासाठी येथे खटाटोप सुरु आहे. खंबाळे गण आदिवासी महिला राखीव असल्याने ह्या गणाही तुल्यबळ लढत होईल.

नांदगाव सदो हा गट आदिवासी महिलेसाठी आरक्षित आहे. प्रचंड प्रमाणावर निवडणुकीचा फिव्हर ह्या गटात उभा राहणार आहे. अनेकांचे राजकारण ह्या गटावर अवलंबुन असल्याने त्यांचा सहभाग संभाव्य जिल्हा परिषद सदस्य कोण होईल हे निश्चित करेल. नांदगाव सदो गण ओबीसी महिला राखीव असल्याने मातब्बर उमेदवार रणसंग्राम गाजवतील. काळुस्ते गण आदिवासी राखीव आहे. येथूनही मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडणुकीत उतरतील. धामणगाव जिल्हा परिषद गट सिन्नर मतदारसंघात आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील विधानसभा निवडणुक काळातले राजकारण उफाळून येते. त्यानुसार ह्या गटात तुल्यबळ उमेदवार उभे राहतील. मोठ्या गावांवर आणि जातीच्या आधारावर विजयाचे गणित अवलंबून आहे. ते बिघडवण्यासाठी विभाजन करण्याचे डावपेच आखले गेले आहेत. धामणगाव गण आदिवासी महिलेसाठी आणि बेलगाव तऱ्हाळे गण आदिवासी राखीव आहे. त्यामुळे गटावर विजय मिळवण्यासाठी एकाच आदिवासी जातीत उमेदवारी न देण्याचा प्रयत्न आहे. 

error: Content is protected !!