
इगतपुरीनामा न्यूज – मोटारसायकलवरून अवैध दारूची वाहतुक करतांना अपघात झाल्याने दारूचे नुकसान झाले. याचा मनात राग धरून अवैध दारू विकणाऱ्या युवकाने टोळक्यासह गावातल्या एका युवकाला खोडाळा येथे दवाखान्यात जाऊन गंभीर मारहाण केली. तरीही दारू विकणाऱ्याचा राग शांत झाला नाही. त्याने चक्क संपूर्ण गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सोबत आणलेल्या मॅक्स गाडीखाली गावातला एक तरी माणूस मारून टाकेलच अशी धमकी तो देत आहे. या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. अंगावर गाडी घालून लोकांना संपवण्याची भाषा करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्याला कायद्याचा धाक अजिबात आहे असे दिसून येत नाही. घोटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ह्या गावातील घटना तीन दिवसापूर्वीची आहे. तरीही पोलीस यंत्रणेकडून संबंधित दहशतखोर व्यक्तीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. ह्या घटनेत शाम सोमनाथ बोढारे, रा हुबाची मेट, ता. त्र्यंबक, जि. नाशिक हा युवक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर घोटीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तीन दिवसापासून दहशत वाढतच असल्याने अखेर २० ग्रामस्थांनी घोटी पोलीस ठाण्यात येऊन गाऱ्हाणे मांडले. मात्र अद्याप त्यांना पोलिसांकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी ‘इगतपुरीनामा’ सोबत बोलतांना दिली. ( व्हिडिओ बघा )
