वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
जल, जंगल व जमीन यांचे संरक्षण खऱ्या अर्थाने या भूमीतील आदिवासी बांधवांनी केले आहे. या देशाचा मूळमालक हा आदिवासी आहे. या आदिवासी बांधवांनी सामाजिक न्यायासाठी मोठा संघर्ष केला असून आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांनी देश स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले आहे. जंगलाचे रक्षण करत वनसंस्कृती जतन करण्याचे काम आदिवासींनी केले आहे. त्यामुळे त्यांचा हक्क काढला तर मोठा संघर्ष करावा लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार सोनोशी येथे केले. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते आद्य क्रांतीकारक यांच्या स्मारक कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आदिवासीच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या लढाईत मी पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. हे रयतेचे राज्य आहे. तसेच सर्व समाजाने राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांचा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे. सत्याची कास धरून जिथे अन्याय होत आहे तिथं झटण्यासाठी काम करा असे ते म्हणाले. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, टाकेद गटातील मतदारांचे मोठ्या प्रमाणात उपकार असून त्यांच्या हितासाठी मी सदैव लढत राहणार त्यांची देणगी म्हणूनच मी गेल्या अधिवेशनात सोनोशी येथील ५० एकर जमिनीवर १०० कोटीचे भव्य स्मारक मंजुर केले आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा खा. शरद पवार, विधानसभा उपाअध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्य गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, सुनिल भुसारा, रंजना पावरा, किरण लहामटे, धनंजय पवार, माजी आमदार निर्मला गावित, माजी खासदार देविदास पिंगळे, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंडम, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती, जाधव, सभापती सोमनाथ जोशी, राहीबाई पोपरे, जि. प. सदस्या सिमंतीनी कोकाटे, सरपंच काशिनाथ कोरडे, जिल्हाध्यक्ष अनिल गभाले आदी उपस्थित होते.