
इगतपुरीनामा न्यूज – राज्यस्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धा ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांचा समावेश आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर ही स्पर्धा होते आणि विजेत्या शेतकऱ्यांना राज्य पातळीवर बक्षिसे दिली जातात. इगतपुरीचे तालुका कृषि अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील ६ शेतकऱ्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. सर्वसाधारण गट आणि आदिवासी गटातून पहिली तिन्हीही पारितोषिके इगतपुरी तालुक्यातील धारगाव या गावातील ६ जणांनी प्राप्त केली आहे. लवकरच राज्य स्तरावरील ह्या बक्षीसांचा वितरण समारंभ होणार आहे. सन २०२४ रब्बी जवस प्रकल्पातील धारगाव येथील शेतकऱ्यांना राज्यस्तरावर सर्वसाधारण संवर्गात पहिला क्रमांक कमळाबाई पांडुरंग शिंदे यांना, दुसरा क्रमांक अशोक रघुनाथ खातळे यांना तर तिसरा क्रमांक विनायक काळू खातळे यांना मिळाला आहे. आदिवासी गटात प्रथम क्रमांक शांताराम सोनू पादीर, दुसरा क्रमांक लक्ष्मण तुळशीराम पादीर, तिसरा क्रमांक गंगा काशीराम भस्मे यांनी पटकावला आहे. विभागीय कृषी सह संचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे, उप कृषी अधिकारी महेश वामन, तत्कालीन मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, एस. पी. पाटील, किशोर भरते, सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश कोकतरे आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.