इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी शहरातील रेल्वे तलाव येथे आंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर आज दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने मानेवर वार करण्यात आले. यामध्ये हा तरुण जागीच ठार झाला आहे. विशाल ठवळे वय ३६ रा. इगतपुरी असे ह्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या घावांमुळे झालेल्या अति रक्तश्रावामुळे ह्या विवाहीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत इगतपुरी पोलिसांना माहिती समजताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे आणि सहकारी पोलिसांनी गतिमान तपास सुरू केला आहे. फरार झालेल्या अज्ञात संशयित आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ह्या घटनेमुळे इगतपुरी शहर आणि परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आज सकाळी जावयाने सासूचा खून, पत्नी आणि मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.