
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पंचायत समितीचे १० गण आणि जिल्हा परिषदेच्या ५ गटांची आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. बदललेल्या आरक्षणाचा फटका सर्वच पक्षातील दिग्गज पुढाऱ्यांना बसला. आधीच प्रमाणापेक्षा जास्त लांबलेल्या निवडणुकीमुळे सर्वांना राजकीय विजनवास भोगावा लागला. त्यांच्यासाठी निघालेले आरक्षण म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. गेली काही वर्ष केलेला सगळा खर्च दारणेत वाहून गेल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस, शेकाप, माकप आदी पक्ष, महायुतीतील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई आदी पक्ष, मनसे, वंबआ, स्वराज्य इत्यादी राजकीय पक्ष निवडणुकीत उतरतील. युती, आघाडी होईल अशी शक्यता नसल्याने प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत आहे. प्रत्येक पक्षांकडे उमेदवार संख्या जास्त असल्याने आधी आणि ऐनवेळी पक्षांतरे मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने राजकीय पक्षही कोंडीत सापडल्याचे दिसते. अजून निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी उमेदवारी, तयारी आणि वरिष्ठांची वारी मात्र सुरु झाली आहे. दिवाळीच्या काळातच उमेदवारी मिळाल्याचे समजून अनेकांनी संपर्क अभियान, समाज माध्यमातून जवळीक साधायला सुरुवात केली आहे.
एकमेव घोटी बुद्रुक हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तालुक्यातील पुढाऱ्यांना घोटी गटाशिवाय पर्याय नाही. ह्या गटात असलेली जातीय, सामाजिक, राजकीय समीकरणे पाहता यंदाची निवडणूक वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता आहे. ह्या गटातील मुंढेगाव गण ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचे राजकीय अस्तित्व टिकण्याला फायदा होतो आहे. तर घोटी बुद्रुक गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. पंचायत समितीचे सभापतीपद ह्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अभूतपूर्व लढत आणि राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. अभी नहीं तो कभी नहीं या प्रमाणे इगतपुरी तालुक्यातील मोठे पुढारी ह्या गटात अस्तित्वाची लढाई करणारच असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुरंगी निवडणूक काय असते याचे दर्शन तालुक्याला होणार आहे. वाडीवऱ्हे हा जिल्हा परिषद गट आदिवासीसाठी राखीव करण्यात आला. ह्या गटात सुद्धा विविध पक्षांचे रथी महारथी पुढारी असल्याने त्यांना संधी लाभणार नाही. ह्या गटात आदिवासी प्रवर्गाच्या दिग्गज राजकीय पुढाऱ्यांना मात्र मोठी सुवर्णसंधी लाभली आहे. या गटातही चुरशीच्या रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. अस्तित्वाच्या लढाईसाठी काहीही करायला मागेपुढे न पाहणारे पुढारी ह्या गटात आहेत. त्यामुळे येथेही बहुरंगी संग्राम आपल्याला दिसणार आहे. ह्या गटातील साकुर आणि वाडीवऱ्हे गणाने तालुक्याला आतापर्यंत तीन चार वेळा सभापती दिले आहेत. दोन्हीही गण सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने अनेक नव्या जुन्या पुढाऱ्यांना सुवर्णसंधी लाभली आहे. त्यामुळे उमेदवारांची मोठी संख्या ह्या दोन्ही गणात असणार आहे.
धामणगाव गटात आदिवासी वगळता अन्य प्रवर्गातील नेत्यांना आरक्षण बदलेल अशी मोठी अपेक्षा होती. ती अपेक्षा फोल ठरून हा जिल्हा परिषद गट आदिवासी राखीव झाला. यासह या गटातील बेलगाव तऱ्हाळे हा गण आदिवासी राखीव तर धामणगाव गण आदिवासी महिलेसाठी राखीव झाला. त्यामुळे ह्या गटात सुद्धा लक्षणीय लढती होतील अशी शक्यता आहे. कायमच दमदार लढती होणारा खंबाळे गट आणि खंबाळे गण सुद्धा आदिवासी राखीव आहे. कावनई गण मात्र ओबीसी राखीव झाल्याने उमेदवारांची सगळी भाऊगर्दी ह्या गणात एकटवेल. ह्या गटात सुद्धा मोठा लढा पहायला मिळू शकतो. नांदगाव सदो गट आदिवासी महिलेसाठी राखीव झाल्याने तयारी केलेल्या दिग्गज उमेदवारांना फटका बसला आहे. समाधानाची बाब म्हणजे नांदगाव सदो हा गण ओबीसी महिलेसाठी राखीव झाला. यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या गणात निवडणूक रणसंग्राम होईल. काळुस्ते गण आदिवासी राखीव असल्याने ह्याही गणात अनेकांना उमेदवारीची संधी लाभेल.