
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाशिकच्या युवा फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे आनंददायी दिवाळी साजरी करण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत या ग्रुपने ग्रामीण भागात आनंद व उत्साहाचा दीप प्रज्वलित केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ग्रुपच्या सदस्यांचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. त्यानंतर वाडीकरांनी सर्व सदस्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात ग्रुपचे सदस्य सार्थक कपूर, हर्षल चौधरी, ओम ठाकूर, सार्थक रहाणे, आयुष कपूर, हेमंत महाजन, मकरंद सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. सार्थक कपूर यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी असा प्रेरणादायी संदेश दिला. दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिवाळी फराळ आणि आकर्षक आकाश कंदील वाटप करण्यात आले. वाडीतील सर्व कुटुंबांना कपडे देऊन आनंदाचा वाटा वाढवण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. सूत्रसंचालन दत्तू निसरड यांनी केले तर वंदना भगत यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, बबन आगिवले, भावडू आगिवले, सखाराम आगिवले, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. युवा फ्रेंड सर्कल ग्रुपच्या उपक्रमामुळे धामडकीवाडीतील आदिवासी शाळा व ग्रामस्थांसाठी दिवाळीचा सण अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरला.
