
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – ब्रिटिशकाळापासून महत्वपूर्ण असणाऱ्या इगतपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. भर पावसाळ्यातील जीवघेणी पाणीटंचाई, कचऱ्याचे आगार, विकासकामांचा अभाव, विरोधी पक्षीयांची आणि नागरिकांची पारंपरिक चुप्पी आदी कारणामुळे इगतपुरी शहर नेहमीच चर्चेत असते. जादुई ठरणारी विविध जाती धर्माची निर्णायक मते आणि बदलत्या काळात नागरिकांची बदललेली जागरूकता या पार्श्वभूमीवर यावेळी ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. थेट नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याचा फायदा घेण्यासाठी रथी महारथी अभूतपूर्व कंबर कसणार असल्याने विविध कारणांनी इगतपुरी शहराचा पुनर्जन्म घडवणारी निवडणूक म्हणून नागरिकांचे विशेष लागून आहे.
ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या इगतपुरी नगरपरिषदेच्या स्थापनेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. नाशिक जिल्ह्यातील ही सर्वात जुनी नगरपालिका असूनही एवढ्या वर्षांत विकासाच्या पाऊलखुणा दिसत नसल्याची नागरिकांची जुनीच तक्रार आहे. शहरात प्रचंड पाऊस पडूनही भर पावसाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आटापिटा करावा लागतो. मूलभूत सुविधा आणि अन्य समस्यांचा अतिरेक झाल्याने नागरिकांच्या संतापात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत होऊ घातलेल्या निवडणुकीत संबंधितांना दणका देण्यासाठी इथले नागरिक प्रतीक्षेत असल्याचे दिसून आलेले आहे.
इगतपुरी शहरात रोजच वाढत असलेली कचऱ्याची समस्या, सांडपाण्याकडे नेहमीच असलेले दुर्लक्ष, नागरिकांचे अनारोग्य आदी प्रश्नांनी नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. मात्र ह्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आणि विरोधकांचे मौन यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. तथापि नागरिकांत वाढलेली कमालीची जागरूकता, समाज माध्यमांचा वापर यामुळे यावेळची निवडणूक प्रस्थापितांना अवजड जाणार आहे.
शिवसेना ( उबाठा ), शिवसेना ( शिंदे ), भाजपा, राष्ट्रवादी ( शप ), राष्ट्रवादी ( अप ), इंदिरा काँग्रेस, मनसे, रिपाई, वंबआ आदी राजकीय पक्ष निवडणूकपूर्व तयारी आणि व्युव्हरचना करत आहेत. थेट नगराध्यक्ष निवडणुकीसह सर्वच जागांवर अतितटीचे सामने पाहायला मिळणार आहेत. इगतपुरी शहरात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. प्रमुख पक्षांनी एकमेकांना शह देण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे यापूर्वीच पक्षांतर घडवून आणलेले आहे. पक्षांच्या अंतर्गत राजकारणामुळे काही दिवसांत उमेदवारांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर पळवापळवी होणार आहे. निवडणुकीचा नगारा वाजायला अवघे काही महिने शिल्लक असल्याने प्रत्येक पक्ष विजयासाठी व्यहूरचना करण्यात मश्गुल आहे. काही ठिकाणी प्रमुख पक्षांना प्रबळ उमेदवार मिळण्याची शक्यता नसल्याने दुसऱ्या प्रभागातून उमेदवार आयात केले जात आहेत तर दुसऱ्या पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवाराला आपल्या तंबूत घेण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातो आहे. ह्या सगळ्या घडामोडींकडे जागरूक नागरिक कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. यावेळी सक्षमतेने विकासाला गती देण्यासह महत्वाचा प्रश्न सोडविणाऱ्या उमेद्वारांची निवड करण्याची जबाबदारी असल्याने सामान्य मतदार निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे. अर्थातच यावेळी इगतपुरी शहराचा पुनर्जन्म घडवणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रतीक्षेत सर्वच इगतपुरीकर आहेत.