
इगतपुरीनामा न्यूज – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांचे आरक्षण आज सोमवारी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांची आरक्षण सोडत इगतपुरी पंचायत समितीच्या सभागृहात तर ५ जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. ही आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळीचे बिगुल वाजणार आहे. दरम्यान प्रत्येक गट व गणातील इच्छुकांची धडधड वाढली आहे. सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने कोणता गण इगतपुरी तालुक्याला सभापती देणार याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण निश्चित झाल्यावर अनेकांची गोची तर अनेकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. इगतपुरी तालुक्यात घोटी, नांदगाव सदो, शिरसाठे, वाडीवऱ्हे, खेड असे ५ जिल्हा परिषद गट आहेत. इगतपुरी पंचायत समितीचे धामणगाव ( जुना टाकेद बुद्रुक गण), काळूस्ते, मुंढेगाव, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, घोटी, खंबाळे, कावनई ( जुना शिरसाठे गण ), बेलगाव तऱ्हाळे ( जुना खेड गण ), साकुर ( जुना नांदगाव बुद्रुक गण ) हे १० गण आहेत. आरक्षण निश्चितीनंतर राजकीय घडामोडी गतिमान होणार असून पूर्वतयारीला वेग येईल.