
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी वस्तीवरील धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वेबग्योर स्कुल ऐरोली ( नवी मुंबई ) येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्याचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा होता. शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी शाळेची शैक्षणिक कार्यपद्धती, विद्यार्थ्यांची प्रगती, वाडीतील लोकजीवन व त्यांच्या अडचणींचा परिचय करून दिला. वंदना भगत यांनी वेबग्योर स्कुलच्या शिक्षकांचे स्वागत केले. दिवाळी सणानिमित्त वाडीतील ग्रामस्थांना किराणा साहित्याचे वाटप केले. शाळेतील विद्यार्थ्यांना सॅन्डविच, चॉकलेट, बिस्कीट, चिप्स, टूथपेस्ट, ब्रश, आंघोळीचा साबण, शैक्षणिक व विज्ञान साहित्य वाटण्यात आले. गप्पा-गोष्टी आणि मनोरंजक खेळांमुळे शाळा आनंदमय वातावरणाने भरून गेली. लोकजागृतीसाठी वेबग्योर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या उपक्रमातून शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संवाद, संवेदना व सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. शेवटी शिक्षक दत्तू निसरड यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले, भावली खुर्दच्या ग्राम पंचायत अधिकारी रुपाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगिवले, बबन आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
