
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
पेन्शनर असोसिएशन संघटनेच्या मागणीप्रमाणे पेन्शन अदालत महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र नाशिकच्या जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले आहे. मागणी पूर्ण झाल्याने संघटनेचा मोठा विजय झाला आहे असे संघटनेचे अध्यक्ष उत्तम गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र थेटे यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्हा परिषद येथे पेन्शन अदालतच्या आयोजनाबाबत पेन्शन असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष उत्तम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष रवींद्र बापू थेटे यांनी नियोजन केले. जिल्हा स्तरावरील अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत घेण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अधिकारी प्रकाश थेटे, रविंद्र आंधळे, पगारे साहेब, योगेश कुमावत, मंदाकिनी पवार यांनी तात्काळ पेन्शन अदालतीचे नियोजन केले.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन दरमहा पाच तारखेच्या आत करावी यासाठी आदेश देऊन याबाबतचे अनुदान पंचायत समिती स्तरावर आज पाठविले असल्याचे सांगण्यात आले. यापुढेही पाच तारखेच्या आत पेन्शन देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांचे रखडलेले अनुदान, रजा रोखीकरण गट विमा,भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, उपदान, अंश राशिकरण व लेखाशीर्ष चुकल्यामुळे परत गेलेले, करण्यात आलेले अनुदान पुन्हा संबंधित पंचायत समिती स्तरावर पाठविण्याबाबत, कालबद्ध पदोन्नती या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा स्तरावरील पेन्शन अदालत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे यांनी प्रास्ताविक, आभार प्रदर्शन सुभाष कंकरेज यांनी केले. संघटनेचे डी. एल. पाटील, विजय वानखेडे, एम. यु. देशमुख, आर. एम. कापडणी उपस्थित होते.
संघटनेने अधिक माहिती देताना सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांना समस्या आहेत त्यांनी ज्या तालुक्यात पेन्शन घेतो त्या ठिकाणी आपल्या समस्या, अनुदानाच्या संदर्भात अर्ज करावा. संबंधित पंचायत समितीमध्ये महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहावे. अर्जाची प्रत जिल्हास्तरावरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावी. सर्वाधिक समस्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सहाययिका, विस्ताराधिकारी यांच्या आढळून आल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या मंगळवारी सकाळी ११ वाजता संबंधित पंचायत समिती स्तरावर अर्जासह हजर रहावे. जी. पी. खैरनार यांनी अवगत केल्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. ( बातमी लेखन : सुभाष कंकरेज, निवृत्त विस्ताराधिकारी )