इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड यांनी जागतिक दिव्यांग दिनाची माहिती देऊन समाजातील दिव्यांग लोकांनी मिळविलेल्या यशाची माहिती देऊन आजही दिव्यांग व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान देत असल्याचे सांगितले.
इगतपुरीच्या गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ ची माहिती देऊन यापूर्वी नाशिक जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोच्च कामगिरी केली असून यावर्षीही आपल्या सर्वांना नाशिक जिल्ह्याला या अभियानात अग्रस्थानी ठेवायचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यासाठी प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन केले. प्रारंभी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील दिव्यांग कर्मचारी पी. जी. मंडले यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला इगतपुरी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अमित भुसावरे, शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे, इगतपुरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक दराडे उपस्थित होते.