
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – नांदगाव सदो, ता. इगतपुरी येथील भूषण गणेश भागडे वय २३ ह्या बेपत्ता युवकाचा मृतदेह आज सकाळी समृद्धी महामार्ग भागातील एका विहिरीत सापडला आहे. हा युवक १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. नांदगाव सदो गावाजवळ एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. युवकाची हत्या झाली असावी अशी चर्चा इगतपुरी तालुक्यात सुरु झाली आहे. या घटनेबाबत इगतपुरी पोलिसांकडून सूक्ष्म तपास सुरु करून घटनेच्या मुळाशी जाऊन शोध सुरु केला आहे. समृद्धी महामार्गावरील मजुरी कामाला जातो असे सांगून भूषण घरी परतला नाही म्हणून वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची खबर इगतपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच दिली आहे. काही दिवसांपूर्वी भूषणचे लग्न जमले होते. मनमिळाऊ असणाऱ्या भूषणच्या बेपत्ता होण्यामुळे ह्या भागातील नागरिक चिंतेत होते. आज त्याचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.