भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणूक मतदारसंघात प्रचाराची धामधूम मोठ्या जोमाने सुरु आहे. प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करून निवडणुकीचा प्रचार करीत आहे. मतदाराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेकानेक प्रयत्न केले जाताहेत. सोशल मीडियावर उमेदवारांचे समर्थक आपल्या उमेदवारांना मत देण्यासाठी आवाहन करीत आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवारांचा सुद्धा चांगलाच घाम निघाला आहे. दारू, मटण पार्ट्या आणि पैसे वाटपाचे कार्यक्रमही चुपचाप सुरु असल्याची कुणकुण आहे. मात्र अनेक मतदारांनी व्यसनधिनता वाढत असल्याबद्धल नाराजी व्यक्त केली आहे. घरातील कुटुंबप्रमुख व्यक्ती दिवसभर उमेदवाराच्या बोंबा ठोकून रात्रीच्या वेळी चिंग होऊन परतततात. यामुळे जाब विचारणाऱ्या बायका मुले, भाऊ, बहिणी आणि आईवडिलांसोबत भांडणे वाढली आहेत. उमेदवारांनी पाण्यासारखा पैसा खर्च करून निवडणुकीला खर्चिक स्वरूप दिले असल्याने मोठ्या प्रमाणावर दारुड्या व्यक्तींचाही प्रत्येक गावात वावर वाढला आहे. महिला आणि मुलींनी सायंकाळी ७ नंतर घराबाहेर पडणे कटाक्षाने बंद केले आहे. कुटुंबात कलह वाढू लागल्याने दारू पाजणाऱ्या उमेदवारांना मायबहिणी शिव्याशाप देत आहेत. हा शिव्याशाप मतदानाच्या दिवशी उद्रेकाच्या स्वरूपात बाहेर पडून संबंधित उमेदवाराला गटांगळ्या खायला लावणार आहे. निवडणूकीत लावलेले दारूचे व्यसन नियमित स्वरूप धारण करण्याचा धोका वाढल्याने संबंधित उमेदवाराच्या विरोधात माता भगिनी मतदान करणार असल्याचे चित्र आहे.
इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित या प्रमुख उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीतर्फे भाऊराव डगळे, स्वराज्यचे शरद तळपाडे, जन जनवादी पार्टीचे अनिल गभाले, बसपाचे धनाजी टोपले, पिसन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गुंबाडे, भारत आदिवासी पक्षाचे कांतीलाल जाधव, स्वाभिमानी पक्षाच्या चंचल बेंडकुळे, अपक्ष उमेदवार बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले, भगवान मधे, बेबी ( ताई ) तेलम, शंकर जाधव, विकास शेंगाळ, कैलास भांगरे निवडणूक लढवत आहेत. प्रत्येकजन आपल्या प्रचार यंत्रणेतून मतदारांपर्यंत आवाहन करीत आहे. प्रमुख उमेदवारांपैकी ३ जण माजी आमदार असून तिघेही आमदार होण्यासाठी झपाटले आहेत. काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव ह्यांनी युवाशक्तीच्या ताकदीवर मतदारसंघ पिंजून काढला आहे. बऱ्याच उमेदवारांच्या सोबत प्रत्येक गाव, वाड्या, पाडे येथील काही लोकं फक्त मद्य पार्ट्या आणि मटण पार्ट्या झोडायला टपलेले आहेत. मुबलक दारू, जेवण आणि पैसेही मिळत असल्याने दारू पिण्याचे प्रमाण चिंताजनक वाढल्याचे दिसून येते. रात्री नऊ वाजेच्या नंतर बऱ्याच व्हाट्स अप ग्रुपवर दारुडे लोकं वाद घालतांना दिसत आहेत. घरी पोहोचल्यानंतर कुटुंबातील लोकांसोबत दारुड्यांचे भांडणे सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे दारू पाजणाऱ्या उमेदवाराची कुटुंबात माहिती घेऊन व्यसनाधिनता वाढवणाऱ्या संबंधित उमेदवाराला चांगलाच शिव्याशापाचा प्रसाद वाटला जातोय. ह्याचा परिणाम २० तारखेला दिसून येणार असून दारूची सवय लावणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात मतदान होईल असा अंदाज आहे.