इगतपुरी नगरपरिषद, ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गणांची निवडणूक लागणार ? : ४ महिन्यात निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत

 इगतपुरीनामा न्यूज – स्थानिक संस्था अनिश्चित काळासाठी अडखळत ठेवता येणार नाहीत. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथं मुदत संपली आहे किंवा प्रशासन राज असलेल्या महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती आणि जिल्हा परिषदांसाठी ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गण आणि इगतपुरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह १९ नगरसेवक पदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र आगामी काळातील पावसाळा पाहता ४ महिन्यानंतर निवडणुका घेतल्या जातील अशीही शक्यता आहे. आजच्या निकालात निवडणूक आयोगाला मुदतवाढ मागण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने पावसाळ्यात निवडणुका होणार नाहीत असे संकेत मिळाले आहेत. तत्पूर्वी लवकरच रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेतल्या जातील असे जाणकाराने सांगितले. इगतपुरी तालुक्यात खंबाळे ( जुना शिरसाठे गट ), धामणगाव ( जुना खेड गट ), नांदगाव सदो, घोटी बुद्रुक, वाडीवऱ्हे हे ५ जिल्हा परिषद गट आहेत. इगतपुरी पंचायत समितीचे धामणगाव ( जुना टाकेद बुद्रुक गण), काळूस्ते, मुंढेगाव, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, घोटी, खंबाळे, कावनई ( जुना शिरसाठे गण ), बेलगाव तऱ्हाळे ( जुना खेड गण ), साकुर ( जुना नांदगाव बुद्रुक गण ) हे १० गण आहेत. यासह इगतपुरी नगरपरिषदेची निवडणूक प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निकालाने इगतपुरी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी काळात पूर्वतयारी करायला वेग येणार असून निवडणुक यंत्रणा कामाला लागणार आहे. बांठिया आयोगाच्या २०२२ च्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समुदायांना आरक्षण दिले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

error: Content is protected !!