
इगतपुरीनामा न्यूज – मार्चमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तर शरीरसौष्ठव स्पर्धा केरळ येथे झाली. या स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील २ विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभागी झाले होते. या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील गणेश नारायण भागडे याने सुवर्ण पदक पटकावले तर ६५ किलो वजनी गटात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. पंढरीनाथ चंद्रकांत बोंडे याने रौप्य पदक पटकावले होते. या यशाबद्दल शुक्रवारी महाविद्यालयातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. प्रतिभा हिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. नाशिप्रचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अन्य विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन महत्वाकांक्षा पूर्ण करावी असे सांगितले. सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी विद्यार्थ्यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती देऊन यश प्राप्तीसाठी जिद्द महत्वाची असल्याचे सांगितले.
हेमंत सुराणा यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मिस्टर वर्ल्ड योगेश निकमचे वडील नारायण निकम यांनी स्वत: शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक पारितोषिके आणि पदक मिळवलेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या तयारीसाठी काय काय करावे लागते त्यांचा आहार योजना प्लॅन, खर्च, एकूण परिस्थिती आदी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता पुढील यश संपादन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा असे सांगितले. सत्कार कार्यक्रमात मारुती कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, रोख बक्षीस देऊन ह्या विद्यार्थ्यांची तीन वर्षांची फी माफ केल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर इगतपुरीतून यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, इगतपुरी, टिटोली, नांदगाव सदो येथील ग्रामस्थ आणि युवक सहभागी झाले होते. विजेत्या खेळाडूंना रितेश भडांगे, पवन पवार, क्रीडा संचालिका प्रा. प्रतिभा सकट यांचे मार्गदर्शन लाभले होते.
