बिबट्याच्या हल्ल्यात ६ वर्षीय मुलगा जखमी : काळुस्ते परिसरात वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते या गावी मंगळवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्यामुळे ६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाच्या आईने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर याठिकाणी वनविभागाने आता कडक पावले उचलली आहे.

जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले हे सुरूच आहेत. अगदी चार दिवसापूर्वीच जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये 10 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी परत इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते या गावी असणाऱ्या कार्तिक काळू घारे या सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा सुरू केल्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली. ही घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर तातडीने कार्तिक घारे याला घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तब्येत गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने इगतपुरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेऊन कार्तिकच्या तब्येती बाबत चौकशी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. याठिकाणी आता 24 तास वनविभागाची गस्त वाढविण्यात आली आहे. काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहे तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याठिकाणी कॅमेऱ्याचे ट्रेक देखील लावण्यात आले आहे असे वनविभागाने सांगितले आहे. सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या. ह्या परिसरात जनजागृती करून बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना प्रबोधन केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!