भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा सन्मान महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांना आज लाभला. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच 86 हजार 581 मतांनी त्यांनी अभूतपूर्व विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षांची आणि अन्य कोणाचीही सोबत नसतांना काँग्रेसचे लकीभाऊ जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तुलनेने अतिशय नवखे, गरीब आणि आक्रमक युवा चेहरा असणाऱ्या लकीभाऊ जाधव यांनी तीन तीन माजी आमदारांना लढत दिली. दुसरा क्रमांक मिळवणे अजिबात सोपे नसतांना त्यांनी मिळवलेले यश त्यांच्यातील नेतृत्वकौशल्य दाखवून गेले. दोनवेळेची आमदारकी, उबाठा शिवसेना, उरलीसुली काँग्रेस आणि नाराज गटांना सोबत घेऊनही माजी आमदार निर्मला गावित थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. शिवसेनेतील त्यांची बंडखोरी त्यांना एवढं अपयश देईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेना शिंदे गट सोडून बंडखोरी करीत मनसेची उमेदवारी केली. मात्र त्यांना अनपेक्षितरित्या चौथा क्रमांकावर फेकले जाण्याची मोठी नामुष्की पत्करावी लागली. समाजाचा मोठा आधार असतांना हा खांब कधी निखळून गेला हे त्यांनाही समजू शकलं नाही. ठेकेदारी, टक्केवारी, विकास आणि अनेक आरोपांची राळ उठवूनही विजयी आमदार हिरामण खोसकर यांनी दिमाखात संतुलित प्रचारयंत्रणा राबवत राहिले. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची फौज, महायुतीची लाडकी बहीण योजना, ३३०० कोटींची विकासकामे आदी फॅक्टर त्यांना अतिशय फायद्याचे ठरले.
काँग्रेसच्या विचारांचा मतदारसंघ आणि हमखास निवडून येण्याचा आत्मविश्वास असल्याने विद्यमान आमदार हिरामण खोसकर, लकीभाऊ जाधव, उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित आदी १८ जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र उमेदवारी मिळण्याची सूतराम शक्यता नसल्याने हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन महायुतीची उमेदवारी मिळवली. यावेळी त्यांनी निम्मी काँग्रेसही आपल्या सोबत नेली. काँग्रेसने आदिवासी विकास परिषद आणि आंदोलनांच्या माध्यमातून देशभर सुप्रसिद्ध युवानेते लकीभाऊ जाधव यांना काँग्रेसने महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरवले. श्री. खोसकर यांनी महायुतीची उमेदवारी मिळवल्याने शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी नाराज होत मनसेचे रेल्वे इंजिन पकडले. लकीभाऊ जाधव यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना उबाठा उपनेत्या निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारीचे ‘हत्या’र उपसले. त्यांना पाठिंबा म्हणून शिल्लक शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य नाराज लोकांनी निवडणूक हाती घेतली. आपल्या आपल्या पद्धतीने प्रमुख उमेदवारांनी प्रचार योजना राबवली. मतदारांपुढे योजनांचे आणि वचननाम्याचे आकर्षण प्रत्येकाने केले. “अर्थकारण” ही करण्यात आले मात्र मतदारांना हिरामण खोसकर यांच्यासह महायुती प्रभावी वाटली. परिणामी विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांचा प्रभाव वाढून ते सलग दुसऱ्यांदा आमदार होऊ शकले.
ह्या निवडणुकीच्या माध्यमातून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाला एकाकी काँग्रेसची लाज राखणारे युवा नेतृत्व लकीभाऊ जाधव हे उमदे उमेदवार लाभले. काँग्रेसच्या अत्यंत खडतर काळातही लकीभाऊ जाधव यांनी मिळवलेली मते त्यांच्या स्वतःच्या करिष्यामुळेच मिळू शकली. महाविकास आघाडीचे किंचितही सहकार्य नसतांना त्यांनी मिळवलेली मते लक्षणीय ठरतात. येत्या काळात विरोधक म्हणून प्रखर भूमिका त्यांच्याकडून राबवली जाऊ शकते. उबाठा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारी करून त्यांच्या राजकीय जीवनाचा बट्याबोळ करून तर घेतलाच पण उबाठा शिवसेनेचे जिल्हा, तालुका, ग्रामीण नेते, काँग्रेसचे प्रदेश, जिल्हा, तालुका आणि स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश, जिल्हा, तालुका, स्थानिक नेते यांनीही स्वतःच्या राजकीय आत्महत्या करून घेतल्या. शिवसेना शिंदे गटात चांगले स्थान, महामंडळ मिळुनही माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी बंडखोरीचा निवडलेला मार्गही त्यांचा राजकीय प्रवास हास्यास्पद ठरवून गेला. या सर्वांच्या तुलनेत काँग्रेसमध्ये कायम राहून दुसऱ्या क्रमांकाची का होईना टिकलेल्या सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची छाती फुगलेली असणार आहे. ह्या विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायती, इगतपुरी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका यथावकाश होतील. त्यावेळी विधानसभेतील राजकारणाचे रागरंग अनेकांना मारक आणि तारक ठरतील हे मात्र नक्की