अबब..! सर्वच १६ उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त ; हिरामण खोसकरांच्या अभूतपूर्व विजयामुळे सर्वांवर आली नामुष्की

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १७ उमेदवारांपैकी महायुतीचे हिरामण खोसकर यांनी प्रचंड मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला. ह्या सामन्यात त्यांनी सर्वच्या सर्व १६ जणांचे डिपॉझिट जप्त करून टाकले. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील पक्षाच्या उमेदवाराला आणि सर्व अपक्ष उमेदवारांना या सामन्यात डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली. निवडणुकीत उतरण्याचे काही नियम असतात. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदवाराची अनामत (डिपॉझिट) रक्कम. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते. जर उमेदवाराने निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाही तर हीच अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते. याच स्थितीला उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त होणे म्हणतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार राखीव जागेवरील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना ५ हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. हिरामण खोसकर यांच्या एकतर्फी विजयामुळे काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, अपक्ष माजी आमदार निर्मला गावित, मनसेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, बसपाचे धनाजी टोपले, जनवादी पार्टीचे अनिल गभाले, पिझन्टस अँड वर्कस पार्टीचे अशोक गुंबाडे, वंचितचे भाऊराव डगळे, भारत आदिवासी पार्टीचे कांतीलाल जाधव, स्वाभिमानीच्या चंचल बेंडकुळे, स्वराज्यचे शरद तळपाडे, अपक्ष कैलास भांगरे, जयप्रकाश झोले, बेबीताई तेलम, भगवान मधे, विकास शेंगाळ, शंकर जाधव या उर्वरित सर्व १६ जणांचे डिपॉझिट जप्त करण्यात आलेले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!