इगतपुरी – राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांचा सलग दुसऱ्यांदा विजय ; काँग्रेसचे लकीभाऊ जाधव दुसऱ्या स्थानी : माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ यांचा दारुण पराभव

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या हिरामण खोसकरांनी दुसऱ्यांदा विजय संपादन केला. त्यांनी 86 हजार 581 मतांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांचा पराभव केला. लकीभाऊ जाधव यांना 30 हजार 707 मते मिळून ते दुसऱ्या स्थानावर राहिले. अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांना 23 हजार 776 मते, मनसेचे काशिनाथ मेंगाळ यांना 20 हजार 374 मते मिळून त्यांचाही दारुण पराभव झाला. महायुतीचे हिरामण खोसकर यांना मतदारसंघातील 1 लाख 17 हजार 575 मतदारांनी कौल दिला. हिरामण खोसकर यांनी हा एकतर्फी विजय संपादित केला. चौरंगी वाटणाऱ्या ह्या लढाईत दुरंगी पण एकतर्फी लढत झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. उबाठा शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या अपक्ष माजी आमदार निर्मला गावित यांच्यासाठी उबाठा शिवसेना, इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि स्थानिक नेत्यांनी दिलेली साथ कुचकामी ठरली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचा मनसेकडून बार फुसका ठरून त्यांना पराभव पत्करावा लागला. नाममात्र शिलेदारांच्या भरवश्यावर काँग्रेसचे लकीभाऊ जाधव यांनी जोरदार झुंज दिली. विजयाचे क्षण येताच हिरामण खोसकर यांच्या समर्थकांनी जोरदार विजयाचा जल्लोष केला. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून होते. 2 लाख 14 हजार 132 मतदान होऊन मतदानाची टक्केवारी 76.32 होती.

विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी केली. महाविकास आघाडीचे तिकीट मिळाले नाही यावरून निर्मला गावित यांनी बंडखोरी केली. त्यांना काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी साथ दिली. ही साथ अत्यंत कुचकामी ठरली. आज नाशिकच्या कन्या विद्यालयात झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत हिरामण खोसकर यांनी मतांची आघाडी घेतली. यावेळी दोन्ही तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हिरामण खोसकर यांनी केलेल्या पक्षांतराचा निर्णायक फायदा घेण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्यांची फळी अविरत कामाला लावली. ३३०० कोटींची विकासकामे दाखवून खोसकरांनी सामान्य नागरिकांची सहानुभूती मिळवली. लाडकी बहीण योजनेचाही त्यांना फायदा झाला.

मला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मला कौल दिला आहे. पक्षासह पदाधिकारी आणि जनतेने दिलेली साथ मोलाची ठरली. हा विजय मी मतदारसंघातील सर्व जनतेला समर्पित करतो.
- हिरामण खोसकर, नवनिर्वाचित आमदार इगतपुरी
आदिवासी विकास परिषद आणि काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवेचे, विकासाचे कार्य आगामी काळातही अविरत सुरूच ठेवील. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मतदारांचे मी ऋण व्यक्त करतो.
- लकीभाऊ जाधव, पराभूत उमेदवार
    उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत
    विजयी - हिरामण खोसकर - राष्ट्रवादी  117575
    पराभूत
    लकीभाऊ जाधव - काँग्रेस - 30994
    निर्मला गावित - अपक्ष - 23776
    काशिनाथ मेंगाळ, मनसे - 20374
    भाऊराव डगळे - वंचित - 6522
    भगवान मधे - अपक्ष - 2884
    विकास शेंगाळ  - अपक्ष - 2050
    बेबीताई तेलम - अपक्ष - 1622
    जयप्रकाश झोले - अपक्ष - 1444
    धनाजी टोपले - बसपा - 1138
    अनिल गभाले - जनवादी पार्टी - 970
    शरद तळपाडे - स्वराज्य - 770
    शंकर जाधव अपक्ष - 646
    कैलास भांगरे - अपक्ष - 644
    चंचल बेंडकुळे - स्वाभिमानी - 624
    अशोक गुंबाडे - पिझन्टस अँड वर्कस पार्टी - 466
    कांतीलाल जाधव - भारत आदिवासी पार्टी - 303
    नोटा -2219

    Similar Posts

    error: Content is protected !!