इगतपुरीनामा न्यूज – सोमवारी इगतपुरी पोलीसांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केल्याप्रकरणी भादवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, ४६५, ४७१, ३४ सह अन्न सुरक्षा मानके कायदा सन २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या गुन्ह्यात मुख्य आरोपी राज किशनकुमार भाटिया, वय ३८, रा. जयपूर, राजस्थान याला २३ जूनला जयपूर येथून अटक करण्यात आली होती. आरोपी राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गुटखा तस्करीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये दोन तीन वर्षांपासून आरोपी राज भाटीया हा फरार होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी राज भाटिया याने दिलेल्या कबुलीत तो २०२१ पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी तुषार कैलास जगताप, वय ३६, रा. त्रिमुर्ती नगर, नाशिक याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी तुषार जगताप हा त्याचे गुटखा तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. जिल्ह्यातील अवैध गुटखा नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांची पथके सत्वर कारवाई करत असून राज भाटिया याचा नाशिक शहरातील हस्तक तुषार जगताप याचे अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलीसांना मदत होणार आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यातील ह्या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करत आहेत.