संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या भाताला योग्य भाव देण्याचे आमदार हिरामण खोसकर आवाहन : आमदारांच्या बैठकीत योग्य भावाने खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांनी दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या भाताला योग्य भाव देऊन त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार्य करावे. अवकाळी पाऊस, भातावरील रोगराई, भांडवलात झालेली वाढ, मजुरांची टंचाई आदी बाबी पाहता शेतकऱ्यांनी भात पिकासाठी कर्ज घेतले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भाताला चांगला भाव देऊन हातभार लावावा असे आवाहन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. घोटी येथील सर्व भात व्यापाऱ्यांच्या समन्वय बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती केली. बळीराजा वाचवण्यासाठी कायम सक्रिय असून आपण सर्वांनी त्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. सर्व व्यापाऱ्यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या विनंतीचा सन्मान करून शेतकऱ्यांसाठी योग्य भावाने भाताची खरेदी करू असे आश्वासन दिले. दारिद्र्य, महागडे खते बियाणे, मजुरांचा खर्च, रोगराई आणि अवकाळी पावसाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे अनेकांचे हातातोंडांशी आलेले भातपीक नष्ट झाले.. उर्वरित शेतकऱ्यांनी अनेकानेक प्रयत्नांनी भाताला वाचवले. अशा भयानक परिस्थितीत हातात आलेल्या भाताला रास्त भाव मिळणे आवश्यक असल्याचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. व्यापाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना मांडल्या. निश्चितपणे शेतकऱ्यांना उत्तम सहकार्य करू असे सर्वानुमते ठरवण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!