ॲड. संदीप गुळवे – ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे समर्थ नेतृत्व : महाविकास आघाडी आणि टिडीएफतर्फे भरणार उमेदवारी अर्ज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या विविध भागात ज्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हजारो कुटुंबांत चूल पेटते असे दैदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र स्व. लोकनेते गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे. आईवडील आणि देवांच्या सोबत स्व. दादासाहेबांची प्रतिमा अनेक घरात पूजली जाते, कारण त्या त्या लोकांसाठी ते देवस्वरूप होते. राजकारण आणि पक्ष न पाहता अनेकांची संकटे काही मिनिटात संपवणारे स्व. दादासाहेब गुळवे यांचा संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध होता. शेतकऱ्यांसाठी २४ तास उपलब्ध असणारं हे व्यक्तिमत्व काही वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या जनसेवेचा वारसा त्यांचे सुपुत्र ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांच्याकडून चालवला जात आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात शिक्षणाशिवाय लोकांच्या उद्धाराचा मार्ग सापडणार नाही, म्हणून शिक्षण संस्थेद्वारे त्यांनी शाळा उभ्या केल्या, हजारो गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे फायदे दिले आणि बऱ्याच घरांमध्ये हक्काचा रोजगार द्यायला मदत झाली. ह्या सगळ्या सेवाकार्यात निरंतर, अखंड उल्हासाने त्यात झोकून वृद्धी करण्याचे व्रत ॲड. संदीप गुळवे यांनी जोपासले आहे. ज्ञानदान, विद्याज्ञान क्षेत्राद्वारे सदृढ आणि सुसंस्कृत शिक्षकांचे सुयोग्य नेतृत्व विधानपरिषदेत करण्यासाठी ॲड. संदीप गुळवे सज्ज झाले आहेत. आगामी काळात हे प्रगल्भ व्यक्तिमत्व शिक्षकांचे प्रतिनिधित्व “आमदार” म्हणून आपल्याला विधानपरिषदेत नक्कीच दिसेल यात कुठलीही शंका नाही.

अनेकांना मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष/, चेअरमन, सभापती, उपसभापती, सरपंच/उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य करून लोकांच्या सेवेचे व्रत स्व. दादासाहेबांनी त्यांच्यात भिनवले होते. दुसऱ्यांना मोठे करणाऱ्या स्व. दादासाहेबांनी कधीही मोठ्या पदांची अपेक्षा ठेवली नाही. म्हणून स्व. दादांच्या नंतर त्यांच्या भक्कम कार्याला वाहून घेतलेले सुपुत्र, प्रामाणिक नेतृत्व आणि प्रभावी कर्तृत्ववान उमेदवार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांनी केला आहे. शिवसेना ( उबाठा ) यांनी त्यांना महाविकास आघाडी, टिडीएफची अधिकृत उमेदवारी देऊन तमाम लोकांच्या भावनांचा सन्मान देऊन शुभशकून दिला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर ( अ. नगर ) जिल्ह्यातील शिक्षकांचे बुलंद आणि अभ्यासू नेतृत्व करण्याची संधी ॲड. संदीप गुळवे यांना लाभली आहे. त्यांना लाभलेला असंख्य जनाधार, शिक्षक मतदार बंधू भगिनींच्या आशिर्वादामुळे या मतदारसंघातून उमदा आणि लढवय्या आमदार विधानपरिषदेत लवकरच दिसणार आहे. उच्चशिक्षित असणारे ॲड. संदीप गुळवे ह्यांनी जिल्हा परिषद सदस्य, एनडीसीसी बँक संचालक, घोटी बाजार समिती, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ, नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघ आदी ठिकाणी पदे भूषवली आहेत. अग्रगण्य “मविप्र” ह्या शिक्षण संस्थेत ते इगतपुरीचे नेतृत्व समर्थपणे करत आहेत. आज ७ जूनला धूमधडाक्यात त्यांचे नामनिर्देशनपत्र भरले जाणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!