भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – अपेक्षेप्रमाणे नाशिक लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकणारा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात अधिकाधिक मतांचे दान टाकल्याचे दिसते. इंदिरा काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित यांचे मतदारसंघात सत्तास्थान भक्कम करणारा हा कौल असल्याचे म्हणता यावे. महायुतीमधील माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड आणि शिवराम झोले या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थिती उभी करणारी रंगीत तालीम ह्या निकालामुळे दिसून येते आहे. मतदार संघातील जनतेकडे विरोधकांना आता सूक्ष्म काळजीने लक्ष घालावे लागेल असा ह्याचा संदेश आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाला गृहीत धरून ठराविक लोकांच्या हातात निवडणूक यंत्रणा राबवण्याचा कारभार दिला. पण सामान्य मतदारांना आणि अंतर्गत निष्ठावान कार्यकर्त्यांना हे अजिबात पचले नसल्याचा कौल मतपेट्यामधून दिसतो. शेवटच्या काही दिवसातील “अर्थपूर्ण घडामोडी” ज्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी होत्या त्यांची घडी बहुतांश प्रमाणात खिशातच सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित कारभाऱ्यांचा कल दिसला. परिणामी ह्याचाच उद्रेक शेवटच्या काही तासांतील वाढलेल्या विरोधी मतदानात परिवर्तीत झाला. दुसरीकडे मतदारांना जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्यातील सामान्य माणूस, त्यांची प्रतिमा आणि प्रचारयंत्रणा राबवणारे शिलेदार भावले. इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या सोबत कायम असणाऱ्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी “वज्रमुठ” बांधून काम केल्यामुळे विजयाचा वेग वाढू शकला. माणसाला माणूस जोडून संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातील नातेवाईक, मित्र, परिचित मतदारांना राजाभाऊ वाजे यांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन सर्वांनी केले. आदिवासी भागात “मशाल” निशाणी पोहोचवण्याचे मोठे असणारे आव्हान लिलया यशस्वी झाले.
नाशिक लोकसभा मतदार संघात इंदिरा काँग्रेसच्या ताब्यात असणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा मतदार संघ आहे. आदिवासी अन मराठा समाजाचे विजयासाठी निर्णायक मतदान, दलित मतदारांची विखुरलेली संख्या अशी इथली वैशिष्ट्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, महायुतीचे हेमंत गोडसे, अपक्ष शांतिगिरी महाराज, वंचितचे करण गायकर यांनी बरेच फॅक्टर वापरले. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित, तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्या ठाकरे शिवसेनेत गेलेले ॲड. संदीप गुळवे, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आदींनी सातत्याने लोकसंपर्काद्वारे राजाभाऊ वाजे यांच्यासाठी जीवाचे रान केले. ह्या सर्वांच्या फौजफाट्याचा निर्णायक वापर करण्यात राजाभाऊ वाजे यशस्वी ठरले. हेमंत गोडसे यांना इगतपुरीतुन एकतर्फी मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. यामध्ये त्यांना काही अंशी यश मिळाले असले तरी यंत्रणा वापरण्यात आणि निवडण्यात त्यांच्या चुका झाल्या. अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्या भक्तांनी जीवापाड काम केले पण त्यांनाही अपेक्षाभंग सोसावा लागला. वंचित बहुजन आघाडीचा बारही इगतपुरीत फुसका ठरला. विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी अपेक्षा उंचावणारे मतदान दिसते आहे. यासोबतच माजी आमदार निर्मला गावित यांच्या आशा वाढवणारे आणि शिवसेनेतील स्थान भक्कम करणारे मतदान ह्या निकालातून स्पष्ट दिसते आहे. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, शिवराम झोले यांना विधानसभेच्या आखाड्यात येतांना विचार करायला लावणारा इगतपुरी मतदारसंघातील कौल आहे.