समृद्धीमुळे पेरू बागेचे ४५ लाखांचे नुकसान ; भरपाई देण्यास टाळाटाळ : बाधित शेतकरी काशिनाथ शिंदे यांचा १० एप्रिलला आत्मदहनाचा इशारा

 

इगतपुरीनामा न्यूज – समृद्धी महामार्गाच्या कामामुळे एक हेक्टर पेरू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करुनही समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. भरपाई न देता फसवणूक करून अन्याय करीत आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. न्याय न मिळाल्यास बुधवारी १० एप्रिलला सकाळी ११ वाजता समृद्धी महामार्ग टोलनाका येथे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी, तहसीलदार इगतपुरी, पोलीस ठाणे घोटी, एमएसआरडीसी, जीवायपीआर कंपनी, ग्रामपंचायत भरवीर खुर्द आदींना पत्रकाची प्रत पाठवण्यात आली आहे. अभियंता विजयकुमार कोळी, एस. के. धोंडगे, मोहिते, तहसीलदार इगतपुरी यांना आत्मदहनाला जबाबदार धरावे असे पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग कामासाठी माती भरावाचे काम २०२० ते २०२२ असे तीन वर्षे सुरू होते. अखंड वाहतुक सुरु असल्यामुळे करणाऱ्या धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या धुळीच्या लोटाने भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांच्याशी पेरू बागेचे मोठे नुकसान झाले. ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. ह्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी काशिनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी गेली ४ वर्ष वारंवार पाठपुरावा केला. मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरे मिळाली असे त्यांनी नमूद केले आहे. समृद्धीचे अधिकारी नुकसान भरपाई न देता फसवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी इगतपुरीचे तहसीलदार, तलाठी, कृषि अधिकारी यांनी पंचनामाही केला आहे. घरातील मौल्यवान दागिने गहाण ठेऊन आणि युनियन बँकेकडून कर्ज घेऊन ह्या पेरू बागेची लागवड केली होती. अनेक प्रयत्न करून नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे अखेर पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी आत्मदहन करून जीवन संपवणार असल्याचे सांगितले. नुकसान भरपाई मिळाली नसल्याने मानसिक, आर्थिक, शारीरिक स्थिती बिघडल्याने माझे जीवन तुमच्या समृद्धी महामार्ग टोलनाका महामार्गाच्या स्वाधीन करीत आहे असल्याचे ते म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!