मुंबई आग्रा महामार्ग अजून किती लोकांचे बळी घेणार ? मुंढेगावच्या अपघाताने आक्रमक आंदोलनाचे सत्र वाढणार ?

भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे विविध केंद्रबिंदू तयार होत आहेत. रोजच कुठे ना कुठे अपघातांची घटना घडत आहे. यामुळे लोकांचे बळी जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कायमचे आणि तात्पुरते अपंगत्व आणि भीषण सामाजिक प्रश्न सुद्धा यानिमित्ताने उद्भवत आहेत. दुर्दैवाने घोटी आणि पिंपळगाव बसवंत टोलनाका प्रशासनाला यांचे काहीही सोयरसुतक नाही. आणखी मोठे दुर्दैवी म्हणजे अशा भयानक परिस्थितीत इगतपुरी तालुक्यात अपघात रोखवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला भाग पाडले जात नाही. सामान्य माणूस आधीच महागाईचा आगडोंब आणि त्याच्या अनेक समस्यांनी हैराण झालेला आहे. अपघातांमुळे अधिक नुकसान सामान्य माणसाला होत असले तरी त्याला ते पेलवणारे नाही. परिणामी अपघातांचे सत्र न थांबल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक व्हायला लागला आहे. आज मुंढेगाव फाट्यावर अविनाश गतीर ह्या निष्पाप युवकाचा हकनाक बळी गेला. नागरिकांनी प्रशासनाचे डोळे उघडवण्यासाठी आता पर्यंतचे मोठे रास्ता रोको आंदोलन सूरू केलं आहे. अजूनही शासनाने याप्रकरणी दक्षता न घेतल्यास लोकांचा संताप वाढायला अजिबात वेळ लागणार नाही हे मात्र नक्की..!

मुंढेगाव फाटा, कसारा घाट, तळेगाव फाटा, पिंप्री सद्रोद्दीन फाटा, बोरटेंभे फाटा, घोटीचा सिन्नर फाटा परिसर, वैतरणा फाटा, घोटीजवळ सुरू असलेले पुलाचे काम, माणिकखांब येथील तीव्र स्वरूपाची वळणे, पाडळी फाटा, गोंदे थायसन कृप कंपनी परिसर, प्रभू ढाबा भागातील हॉटेलांमध्ये येणारी वाहने आणि त्याच भागातून विरुद्ध दिशेने गोंदे फाट्याकडे येणारी वाहने, गोंदे फाटा ते व्हिटीसी फाट्यापर्यंतचा परिसर, वाडीवऱ्हे परिसर ते रायगडनगर पर्यंतचा परिसर, रस्त्यात अचानक येणारी जनावरे अशा अनेक कारणांमुळे अपघातांची मालिका वाढायला मदत होते आहे. ह्या सर्व अपघातांच्या ठिकाणांवर अपघात होण्याच्या कारणांचा सूक्ष्मपणे शोध घेतल्यास अपघात थांबवायला निश्चित मदत होणार आहे. दोन्ही टोलनाका प्रशासनाने ह्या कारणांचा अभ्यास करून युद्धपातळीवर कार्यवाही करणे अपेक्षित असतांनाही हे मात्र होत नाही. मुंढेगाव, गोंदे फाटा, वाडीवऱ्हे, व्हिटीसी फाटा येथे पूल, वर्दळीच्या कंपन्यांच्या भागात पायी चालणाऱ्यांसाठी पादचारी पूल, जनावरांना रस्त्यावर येऊ न देण्यासाठी संरक्षक जाळ्या, सर्वच ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, गती नियंत्रणासाठी फलक आणि कॅमेरे, तीव्र वळणं काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, वाहतूक नियमांचा जागर असे अनेक उपाय करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.

अपघात झाले की त्या त्या भागातून निवेदने देऊन प्रशासनाकडे केविलवाणी याचना केली जाते. इशारे दिले जातात मात्र काही दिवसांनी पुन्हा शांतता घेतली जाते. यामुळे प्रशासनही गेंड्याच्या कातडीचे बनले आहे. तात्कालिक परीस्थिती हाताळून जुजबी चर्चा केली की सर्वजण शांती घेतात असा त्यांचा नियमित अनुभव आहे. आज सुपात असलेले उद्या निश्चितच जात्यात जाणार आहेत. ही काळाची पावले ओळखून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी सामान्य लोकांच्या न्याय हितासाठी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने संघर्ष केल्याशिवाय अपघातांची संख्या कमी होणार नाही. ७३ व्या घटनादुरूस्तीने ग्रामसभेला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून पीडित गावांतील लोकांनी आपल्याला आपल्या भागात काय उपाययोजना हव्या आहेत याबाबत ठराव मंजूर करायला हवेत. नुसते ठराव करूनही भागणार नाही त्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.

अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी टोलनाका प्रशासनाकडून सेवा बऱ्याचदा मिळत नाही. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वरातीमागून घोडे दामटत उशिराने येते. अशा भयंकर काळात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धामतर्फे गोंदे फाट्यावर मोफत रुग्णवाहिका २४ तास अखंडित सेवा देत आहे. ह्या रुग्णवाहिकेने आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. अशा प्रकारच्या मोफत आणि आवश्यक सेवांना पाठबळ देण्यासाठी सेवाभावी नागरिकांनी स्वतःहून पुढे यायला हवे. तालुक्याच्या अनेक भागात अनेक कामे होत असतांना त्याची उपयुक्तता किती हा संशोधनाचा विषय आहे. सेवाभावी कार्यासाठी सुद्धा संबंधितांनी आपले हात मुक्त केले तर वाचलेल्या कुटुंबाचे आशीर्वाद लाभतील.

Similar Posts

error: Content is protected !!