इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक देऊन झालेल्या अपघातात हा युवक जागीच ठार झाला. अविनाश कैलास गतीर असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मुंढेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला रास्ता रोको आंदोलन सुरु झाले आहे. मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही बाजूला दीड दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांच्या रांगा क्षणाक्षणाला वाढत आहेत. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. यामुळे वरिष्ठ पोलीस प्रशासन, महामार्ग प्रशासन, महसूल अधिकारी आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संतप्त आंदोलकांचा निर्धार आहे. अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर ग्रामस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात. मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे उड्डाण पूलाची प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करण्यात येत आहेत. ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय महामार्गावरील रास्ता रोको मागे घेणार नाही. मृत युवकाच्या मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी संतप्त भावना आहे. घटनास्थळी किमान ८ ते १० हजार नागरिकांचा जमाव उपस्थित आहे. अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक MP 13 H 0349 आणि वाहनचालक ग्रामस्थांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान रात्री पावणेबाराच्या सुमाराला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांची चर्चा होऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शब्द दिला. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे पोलीस पथक यावेळी हजर होते. तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून मार्ग काढला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group